काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचा दिल्ली दौरा खुप गाजला होता. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट राज यांनी घेतली होती. लोकसभेला मनसेला सोबत घेण्याची तयारी भाजपाने केली होती. आता मनसेला किती जागा सुटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना राज ज्या चार्टर्ड विमानाने गेले ते ट्रॅक करण्यास जगविख्यात यंत्रणांनाही अपयश आले होते, हे विमान कोणते, ट्रॅक का होऊ शकले नाही, याची चर्चा रंगली आहे.
राज ठाकरेंना दिल्लीला नेण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दिल्लीत एक अलिशान कारही त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आली होती. राज ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, तिथेच ती कार अख्खा दिवस थांबून होती. एकंदरीत महाराष्ट्र सर करण्यासाठी राज यांना पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
राज ज्या विमानाने गेले ते चार्टर्ड विमान कस्टमाईज केबिन, मॉडर्न गॅलरी, वायरलेस इंटरनेट, दिवान बेड सारख्या लक्झरीचे होते. परंतु, यापेक्षाही महत्वाचे म्हणजे राज यांचे विमान फ्लाईटरडार२४, फ्लायवेअर आणि एअरवन रडारबॉक्स सारख्या फ्लाईट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मनाही ट्रॅक करता आले नाही. राज यांच्यासाठी Embraer Legacy 650 aircraft हे विमान वापरण्यात आले होते. आजतकने य़ाचे वृत्त दिले आहे.
काही काळापूर्वी अब्जाधीश एलन मस्क यांचे विमान ट्रॅक केले जात होते. यामुळे आता कंपन्यांनी महनीय व्यक्तींसाठी अशी विमाने तयार केली आहेत जी रडारना ट्रॅक होऊ शकत नाहीत. ही विमाने उड्डाण केल्यानंतर संपर्कात तर असतात परंतु त्यांची मुव्हमेंट कोणालाच समजत नाही. ही विमाने सेलिब्रिटी, बिझनेस टायकून वापरू लागले आहेत.
राज ठाकरेंचे हे विमान अहमदाबादच्या कमर्शिअल चार्टर ऑपरेटरकडे रजिस्टर आहे. लोकसभा निवडणूक आहे. अशातच नेत्यांना त्यांच्या गुप्त भेटीगाठी लपविणे आजच्या या राजकीय परिस्थितीत कठीण झाले आहे. जरा कुठे खुटूक झाले की दुसऱ्या मिनिटाला त्याची बातमी, व्हिडीओ, फोटो बाहेर येतो. अशाप्रकारच्या विमानांमुळे नेत्यांना त्यांचे दौरे, गाठीभेटी लपविणे सोपे झाले आहे.
आता ही सिस्टिम भारताने चार्टर्ड विमानांमधील प्रवाशांचे खासगीपण जपण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. यूएस फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (एफएए) च्या प्रोग्रॅमनुसार या गोष्टी चालतात. यासारखाच प्रोग्रॅम भारतात वापरला जात आहे. एलएडीडी प्रोग्रॅमनुसार विमानाचा रजिस्ट्रेशन नंबर फ्लाइटरडार24 सारख्या प्लॅटफॉर्मना सार्वजनिक केला जात नाही. सरकारी एजन्सी हा डेटा वापरू शकते. एडीएसबी एक्सचेंज सारखे ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म ही विमाने ट्रॅक करण्यासाठी सक्षम आहेत.