ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाण्यात जाऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या गोविंदा पथकांची भेट घेणार आहेत. दहीहंडीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर टीका करत मनसे प्रमुख राज ठाकरे नऊ थर उभारण्यावर ठाम होते. त्यानंतर मनेसेने ठाण्यात नियम मोडत ४० फुटांची हंडी उभारली होती. त्यानंतर पोलिसांनी दहीहंडीच्या दिवशी जोशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदा मंडळावर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी हादरले असून उद्या राज यांच्या भेटीमुळे त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचमुळे पुन्हा या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश पायदळी तुडवत दहीहंडी उत्सव साजरा केल्याप्रकरणी ठाण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांसह १६ गोविंदा मंडळांवर नौपाडा पोलिस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये नऊ थर लावत मनसेची हंडी फोडणाऱ्या जय जवान मंडळाचाही समावेश आहे. मनसे वगळता ठाण्यातील अन्य आयोजक मात्र गोविंदा पथकांना चारपेक्षा जास्त थर लावू देत नव्हते. मनसेच्या ४० फुटी हंडीसाठी अकरा लाखांचे बक्षिस ठेवले होते. त्यामुळे आता पुन्हा याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.