संजय राऊत आले, ६ मिनिटं बोलले अन् निघून गेले; म्हणाले, "हे यश मोदी-शाहांचे नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 11:16 AM2023-12-03T11:16:24+5:302023-12-03T11:17:06+5:30
निकालाचे सुरुवातीचे कल असतात. कधी हे ट्रेंड कायम राहतात तर कधी नाही. शेवटच्या फेरीपर्यंत आपण थांबायला हवं असं राऊत म्हणाले.
मुंबई - मिझोराममध्ये भाजपा नाही. छत्तीसगडमध्ये भाजपा येणार नाही. तेलंगणातही भाजपा नाही. मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपाचा कल आहे. परंतु निकाल स्पष्ट व्हायला अजून वेळ आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात काटे की टक्कर आहे. काँग्रेसनं मोठं आव्हान दिले.जर या दोन्ही राज्यात भाजपा जिंकले तर मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानात वसुंधरा राजे यांचा हा विजय असेल. तो मोदी-शाह यांचा नसेल अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
४ राज्याच्या निकालावर संजय राऊत माध्यमांशी बोलले की, निकालाचे सुरुवातीचे कल असतात. कधी हे ट्रेंड कायम राहतात तर कधी नाही. शेवटच्या फेरीपर्यंत आपण थांबायला हवं. २ वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील. आपल्याला अखेरपणे वाट पाहावी लागेल. पाचही राज्यात जर भाजपाने सत्तेचा दावा केला असेल तर तो विनोद म्हणून घ्यायला हवा. मिझोराममध्ये भाजपा औषधालाही शिल्लक नाही.तिथे स्थानिक पक्ष आहेत. तेलंगणात भाजपा चौथ्या नंबरवर आहे. त्यांना १० जागाही मिळण्याची शक्यता नाही. तिथे काँग्रेस पुढे आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार बनवेल. मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपा-काँग्रेसमध्ये टक्कर असेल. या दोन राज्यात यश मिळाले तर ते मोदी-शाह यांचे नसेल असं त्यांनी म्हटलं.
मध्य प्रदेश, राजस्थानची स्थिती काय?
मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत आतापर्यंतच्या कलांमध्ये १५० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.तर काँग्रेस केवळ ७३ जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थानमध्ये अटीतटीची लढत होत असून, इथे भाजपा १०७ आणि काँग्रेस ७९ जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होते, त्याचप्रमाणे यंदाही असेल, असे सुरुवातीच्या कलामधून दिसते.
छत्तीसगड विधानसभेसाठी ९० जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमध्ये २०१८ नंतर १५ वर्षांनी काँग्रेस सत्तेत आली होती. परंतु आता काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी चुरशीची लढत करावी लागत आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच टक्कर दिसत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कलानुसार, काँग्रेसने ३८ जागांवर आघाडी घेतली असून भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!