मुंबई
राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपलं आहे. राज्यातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी ४ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण त्यास आता विलंब होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी घ्यावी लागते असा नियम आहे. यासंदर्भातील परवानगी अद्याप आलेली नाही. त्यामुळे जोवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी येत नाही तोवर मतमोजणीला सुरुवात होऊ शकत नाही.
भाजपानं राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर तसंच सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान कल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भातील सविस्तर पत्र देखील निवडणूक अधिकाऱ्यांना भाजपा आमदारांनी दिलं आहे. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी नियमांचं उल्लंघन करुन मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांची मतं बाद करण्याची मागणी भाजपानं केली आहे.
दुसरीकडे भाजपा नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप महाविकास आघाडीकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे जोवर केंद्रीय निवडणूक आयोग यावर निर्णय देत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.