मुंबई, दि. 19 - सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेली रॅली ही रॅली फॉर रिव्हर नाही तर ती रॅली फॉर मदर आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण शक्तीने सहभागी होईल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.काल नॅशनल स्पोर्टस् क्लब मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव, श्रीमती अमृता फडणवीस यांच्यासह सिने- उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.नदीला आपण माता मानतो आणि त्याच नदीला प्रदुषित करतो हे योग्य नाही. त्यामुळे सदगुरुंनी रॅली फॉर रिव्हर ची आणलेली संकल्पना ही राष्ट्र हिताची संकल्पना असून त्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे. वृक्ष लागवड किंवा रॅली फॉर रिव्हर हे फक्त कार्यक्रम नाहीत हे एक मिशन आहे. जे आपल्या सर्वांना मिळून पूर्ण करावयाचे आहे. आईच्या ऋणाची परतफेड करता येत नाही पण वसुंधरा मातेचे ऋण वृक्ष लागवडीच्या माध्यमातून काही प्रमाणात फेडता येते. नदी ही जीवनरेखा आहे तर पाणी हे जीवन त्यामुळे आपलं जीवन असलेल्या नदी आणि वृक्ष संवर्धनासाठी सर्वांनी या उपक्रमात आपले योगदान द्यावे असे आवाहन ही त्यांनी केले.पर्यावरण शास्त्र फॅशनचा नाही काळजीचा विषय- सदगुरु जग्गी वासुदेवया पृथ्वीतलावरची आपली शेवटची पिढी आहे असे समजून आपण सर्व संपवत चाललो आहोत हे खुप चिंताजनक असून पर्यावरण शास्त्र केवळ फॅशन नाही तर सर्वात मोठा काळजीचा विषय आहे असे सदगुरु जग्गी वासुदेव यांनी यावेळी म्हटले ते म्हणाले की, पर्यावरणाच्या संरक्षणात मानवी क्षमतांचा वापर करून घेणे शक्य आहे फक्त याची योग्य जाणीव होणे गरजेचे आहे. इच्छाशक्ती असेल तर आपण प्रदुषण नक्कीच कमी करू शकतो. भारतामध्ये ४ टक्के पाणी हे हिमालयीन नद्यांमधून येते तर उर्वरित पाणी हे फॉरेस्ट वर आधारित आहे हे आपले नशिब आहे. चांगले वन पाण्याचा जमीनीत चांगला निचरा करते. त्यामुळे पाणी, नदी वाचवायची असेल तर वनक्षेत्र वाढवणे, नदीकाठी मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. नदीचे नुकसान एका रात्रीत भरून निघणार नाही. हा विषय भावनिक होऊन हाताळण्याचा विषय नाही तर त्यासाठी शास्त्रीयदृष्टीकोनातून एक निश्चित कार्यक्रम आखणे आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी एकात्मिक धोरणाची गरज आहे. या कामासाठीची दीर्घकालन समर्पितता आवश्यक आहे. मातीला जीवन देण्याची गरज आहे. मातीतील ऑर्गेनिक कंटेट वाढवण्याची गरज आहे. नैसर्गिक स्त्रोतांचे शाश्वत प्रयत्नातून संवर्धन करणे गरजेचे आहे. पिक शेतीकडून आपल्याला फलोत्पादनाच्या शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणे शक्य होईल, त्यातून मातीचा पोत सुधारेल. परंतू हे करतांना कृषी आणि फळ प्रक्रिया उद्योग क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.रॅली फॉर रिव्हरच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे ही सन्मानजनक बाब असल्याचे श्रीमती फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या की, आपल्याला जी पृथ्वी मिळाली ती त्याच वैभवाने किंबहून तिचे जतन आणि संवर्धन करून पुढच्या पिढीला देणे आवश्यक आहे, त्यासाठी सदगुरुंचे हे अभियान खुप महत्वाचे आहे. त्यातून मानवी जीवन फुलणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे वनाच्छादन वाढवण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमास मोठ्याप्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी, कला, उद्योग, संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अतिशय उर्त्स्फुत वातावरणात या सर्वांनी रॅली फॉर रिव्हर या उपक्रमाला आपला पाठिंबा जाहीर केला.
'रॅली फॉर रिव्हर नाही तर रॅली फॉर मदर' , महाराष्ट्र शासन पूर्ण शक्तीने सहभागी होणार- सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 5:58 PM