सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळातील ज्यांच्या कार्यपद्धतीवर माधवराव चितळे समितीने ठपका ठेवला आहे, अशा रामराजे नाईक-निंबाळकर यांची विधान परिषदेच्या सभापतिपदी झालेली निवड नैतिकदृष्ट्या चुकीची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडीचा फेरविचार करावा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाचेच ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर पलटवार केला. पवारांमुळे मोठे होऊन यांनी पवारांचाच विश्वासघात केला असून, नाकापेक्षा मोती जड ठरला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.रामराजेंनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी बुधवारी पत्रकार परिषदेत थेट रामराजेंच्या निवडीलाच आव्हान दिले. अशा भ्रष्ट लोकांची पवारांनी वेळीच हकालपट्टी केली असती, तर पक्षाची स्थिती अशी झाली नसती, असे सांगून उदयनराजे म्हणाले, जनतेने मला दोन वेळा ‘इ-टेंडरिंग’ पद्धतीने विक्रमी मतांनी निवडून दिले आहे आणि कॉन्ट्रॅक्ट दिले आहे; तुमच्यासारख्या भ्रष्ट लोकांची थडगी बांधण्याचे.पंधरा वर्षे उलटूनही नीरा-देवघरचे पाणी का आले नाही, असे मी विचारले, तर यांचा एवढा तोल का जावा? पैसे खर्च झाले; पण कामे झाली नाहीत, असे चितळे समितीने म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीची परवानगी दिली आहे. पाणी का पोहेचले नाही? कुठे जिरले की जिरविले? रामराजे या प्रश्नांची उत्तरे देतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी अशोभनीय भाषेत टीका केली, असे ते म्हणाले.मिरवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी यांना पद हवे आहे. सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांनी उदयनराजेमुक्त जिल्हा करण्याच्या केवळ वल्गना करू नयेत. कार्यक्रम आखा आणि पाहा लोक तुम्हाला कसे झुगारतात ते, असे आवाहन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
रामराजे म्हणजे पवारांना नाकापेक्षा मोती जड !
By admin | Published: April 02, 2015 2:50 AM