मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान योगगुरू बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
रामदेव बाबा यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांनी या भेटीचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. असं असतानाच आता रामदेव बाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. "एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष, शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत" असं म्हटलं आहे.
आम्ही मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचं प्रामाणिकपणे पालन करत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो. बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते. शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत असं आम्हाला वाटतं. या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही संवाद केला. फार चांगलं वाटलं" असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.