रणगाड्यांनी शत्रूच्या चौक्या केल्या उद्ध्वस्त; अहमदनगर येथे लष्कराची प्रात्यक्षिके
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 03:36 AM2020-01-14T03:36:58+5:302020-01-14T03:37:12+5:30
उपस्थितांच्या डोळ्यांचे फिटले पारणे
निनाद देशमुख/नवनाथ खराडे
अहमदनगर : आकाशातून वाऱ्याच्या वेगाने येत बॉम्ब टाकणारे हेलिकॉप्टर, कानठळ्या बसवणाºया तोफांद्वारे शत्रूवर भेदक मारा करत अचूक वेध घेणारे रणगाडे, चारही बाजूने होणारा गोळीबार...अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि जोश यामुळे भारतीय सैन्याने शत्रूच्या चौक्यांवर ताबा मिळवत तिरंगा फडकवला. हा थरार सोमवारी उपस्थितांनी के. के. रेंज येथे प्रत्यक्ष अनुभवला.
लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे सोमवारी के.के रेंज वर आॅपरेशन ‘कवच प्रहार’ या युद्ध प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यात लष्कराच्या टँंक रेजिमेंटची चपळता, गतिशीलता आणि भेदक रणगाड्यांची मारक क्षमता उपस्थितांनी अनुभवली. यावेळी आर्मड कोर अॅण्ड स्कूल अॅण्ड मॅकेनाइज्ड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा आणि मित्र राष्ट्रांच्या लष्कराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतीय लष्कराचे रणगाडे त्यांची मारक क्षमता आणि वेगवान हालचाली करण्याची क्षमता दाखवणासाठी तसेच डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज आणि टेक्निकल स्टाफ आॅफिसर कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी या युद्ध प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. तीन तास चाललेल्या या युद्ध सरावाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या भागात रणगाडे, बीएमपी वाहने आणि अटॅक हेलिकॉप्टर यांच्या यांत्रिक कौशल्याची माहिती देण्यात आली. दुसºया भागात रणगाडे आणि चिलखती वाहनांची माहिती देण्यात आली.
अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरले आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात.
रणगाड्यांचे महत्त्व कायम - मेजर जनरल एस. झा
पहिल्या महायुद्धापासून युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर होतो. शंभर वर्षांनंतरही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. दहशतवादी कारवायांचा
बीमोड करताना, तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर रणगाड्यांचा चांगला वापर होऊ शकतो. त्याद्वारे आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्य होते, असे मत मेजर जनरल एस झा यांनी सोमवारी व्यक्त केले.