चंद्रपूर - चंद्रपूर येथील प्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये रविवारी पर्यटकांना एक सुखद आणि दुर्मीळ अनुभव मिळाला. जंगल सफारीनिमित्त रविवारी ताडोबामध्ये पर्यटकांची गर्दी होती, यावेळी वाघाच्या या जंगलात एक दुर्मीळ असा ब्लॅक पॅंथर पर्यटकांना पाहायला मिळाला. पर्यटकांनी या ब्लॅक पँथरचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याआधी मे 2018 मध्ये बेल्जियमवरून आलेल्या पर्यटकांना ताडोबा येथील कोळसा वनपरिक्षेत्रात शिवनझरी येथील पाण्याच्या टाकीवर काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. या जोडप्याने ताडोबात दुर्मीळ असा ब्लॅक पॅंथर दिसल्याची माहिती दिली होती. त्यांनी या ब्लॅक पँथरला आपल्या कॅमेरात कैद केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वनविभागाला सतर्क राहून काळ्या बिबट्याला ट्रॅक करण्याचे आदेश दिले होते.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला राज्यात तसेच देशात विशेष महत्त्व आहे. राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या या जंगलात आढळून येते. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक या व्याघ्र प्रकल्पाचा आनंद घेण्यासाठी येत ताडोबात येत असतात. ताडोबातील या ब्लॅक पँथरच्या दर्शनाने पर्यटकांना पर्यटनाची नवी पर्वणी मिळणार आहे.