Lockdown: शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:06 AM2021-04-19T06:06:17+5:302021-04-19T06:06:45+5:30
गर्दी टाळण्यासाठी निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत म्हणून मुंबई, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, जेणेकरुन अधिकृत शिधावाटप दुकानात एकाचवेळी गर्दी होणार नाही.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंपासून वंचित राहावे लागू नये यासाठी आवश्यक सूचना उपनियंत्रक शिधावाटप यांच्यामार्फत सर्व यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. अधिकृत शिधावाटप दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना सरकारकडून देय असलेले अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दुकानदार फसवत नाही ना?, अशी करा खातरजमा
nमुंबई, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांना सरकारकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशिलाबाबत माहिती हवी असल्यास सरकारच्या http://mahaepos.gov.in या वेबसाईटवर क्लिक करावे.
nयेथील आरसी डिटेल्समध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकाने शिधापत्रिकेसाठी त्यांना देण्यात आलेला १२ अंकी एसआरसी नंबर टाकून आपल्याला किती शिधा मिळणार आहे याची खातरजमा करावी. याबाबत समस्या असल्यास संबंधित हेल्पलाईन तसेच ई-मेलवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी.
nवन नेशन-वन रेशन कार्डसंबंधी हेल्पलाईन क्रमांक - १४४४५
nअन्य हेल्पलाईन क्रमांक - ०२२-२२८५२८१४
नियमांचे पालन करा!
शिधापत्रिकाधारकांची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी शिधावाटप दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिधापत्रिकाधारकांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे अशा नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
...तर नक्की तक्रार करा!
काेराेना संकटकाळात सरकारकडून शक्य तेवढी सर्व मदत गरीब शिधापत्रिकाधारकांना करण्यात येत आहे. यात कुठलाही गैरप्रकार हाेत असल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तक्रार करा, त्यावर कारवाई हाेईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.