लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी राज्यात चुरस वाढू लागली आहे. शिवसेनेचे दोन भाग, राष्ट्रवादीचे दोन भाग झाले आहेत. यामुळे हे पक्ष एकमेकांच्या गटाच्या उमेदवारांना पाडण्यातच धन्यता मानण्याची शक्यता आहे. यामुळे तिसऱ्याचाच लाभ होताना देखील दिसणार आहे. अशातच अमरावतीमध्ये काय होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार नवनीत राणा यांना भाजपच्या कमळावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती. यावर आता आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया आली आहे. भाजप नेते व बावनकुळे यांना वाटतेय की नवनीत राणा यांनी भाजपाच्या चिन्हावर लढावे. आम्ही देवेंद्र फडणवीस व केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहोत. शिवाय NDA चा घटक देखील आहोत, असे राणा म्हणाले.
देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवनीत राणा आशीर्वाद देतील. आम्ही NDA चे घटक आहोत यामुळे ते नवनीत राणा यांना पाठींबा देतील. आम्ही आघाडी धर्माचे पालन केले आहे, भाजपही आघाडी धर्माचे पालन करेल. नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला.