पहिली ‘बॅटरी एसयूव्ही’ धावण्यास सज्ज !‘एक्स टेक्स्ला’ एसयूव्हीचा नेदरलँड-मुंबई प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:00 AM2017-12-18T03:00:26+5:302017-12-18T03:01:00+5:30
वाढते प्रदूषण आणि डिझेल-पेट्रोलच्या अनियंत्रित किमतींमुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळेच सध्या सरकारतर्फे विजेवर चालणा-या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले जात आहे.
महेश चेमटे
मुंबई : वाढते प्रदूषण आणि डिझेल-पेट्रोलच्या अनियंत्रित किमतींमुळे वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळेच सध्या सरकारतर्फे विजेवर चालणा-या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले जात आहे. देशात पहिली इम्पोर्टेड विद्युत एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) एक्स टेक्स्ला कार मुंबईत दाखल झाली आहे. विजेवर चालणाºया या अत्याधुनिक एसयूव्ही कारची नोंदणी मुंबईतील ताडदेव आरटीओमध्ये पूर्ण करण्यात आली. सुमारे तीन कोटी रुपये किमतीच्या या कारसाठी आरटीओतर्फे सुमारे ४० लाखांहून अधिक रकमेची ‘करसूट’ देण्यात आली आहे.
मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात या विद्युत एसयूव्हीची नोंदणी झाली. ही कार ७ आसनी आहे. पूर्णपणे विजेवर चालणाºया या एसयूव्हीचा टॉप स्पीड २५० किलोमीटर प्रतितास असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डीपब्ल्यू रंगाची कार गेल्या आठवड्यात मुंबईत सागरी मार्गाने कंटेनरमधून दाखल झाली. गेल्या आठवड्यापासून या कारची नोंदणी प्रक्रिया सुरू होती. या कारची किंमत २ कोटी ८९ लाख रुपये आहे. ताडदेव आरटीओमध्ये शहरातील खासगी गुंतवणूक कंपनीच्या नावे या कारची नोंदणी झालेली आहे.
साधारणपणे एक कोटी किंमत असलेल्या इम्पोर्टेड कारसाठी २० लाखांपर्यंत कर आकारला जातो. मात्र ही विद्युत कार असल्यामुळे आरटीओमधून कोणत्याही प्रकारचा कर लावण्यात आलेला नाही. यामुळे देशातील पहिल्या ‘इम्पोर्टेड विद्युत’ एसयूव्ही कारला तब्बल ४० लाखांहून अधिक रकमेची घसघशीत सूट मिळाली आहे.
आगामी २०३० सालापर्यंत देशात १०० टक्के वाहने ही विजेवर धावणारी असतील, असे लक्ष्य सरकारने निश्चित केले आहे. ही कार सुरक्षित, वेगवान आणि एसयूव्ही प्रकारातील सर्वांत उच्च श्रेणीची आहे. यामध्ये आठ कॅमेरे आणि १२ सेन्सर आहे. धूरके, धुके, पाऊस आणि धूळ यांच्यापासून चालकाला कार चालवताना सोपे जाईल, अशी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ही कार २.९ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास एवढा वेग घेते, असा दावा संबंधित कार कंपनीच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे.
नेदरलँड ते मुंबई-
नेदरलँड येथून ही कार इम्पोर्ट करण्यात आली. गेल्या आठवड्यात सागरी मार्गाने कंटेनरमधून ही कार मुंबईत दाखल झाली. विद्युत कार असल्यामुळे या कारची नोंदणी प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. मात्र संबंधित अधिकाºयांनी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आरटीओ अधिकाºयांनी दिली.