पुणे : महिलेच्या नावाने फेसबुक अकाऊंट उघडून त्याद्वारे मैत्री वाढवून कस्टमच्या ताब्यातून वस्तू सोडविण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरायला सांगून 1 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एका 60 वर्षांच्या नागरिकाने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार 1 आॅक्टोबर ते 31 नोव्हेंबर 2017दरम्यान घडला. फिर्यादी यांच्या फेसबुक अकाऊंटवर मेरलीन रजर नावाने एकाने लिंक पाठवून मेसेजद्वारे एकमेकांशी चॅटिंग केले़ फेसबुकवर एका विदेशी सुंदर तरुणीचा फोटो ठेवून ते तरुणीचे अकाऊंट आहे, असे दर्शविले.
ती लंडन येथे व्यावसायिक असल्याचे व तिने व्यवसायानिमित्त फिर्यादी यांना भेटण्याकरिता पुण्यात येत असल्याचे फेसबुकवरमेसेजद्वारे सांगितले. त्यानंतर दिल्ली येथे आल्याचे भासवून कस्टमने तिची रक्कम व वस्तू ताब्यात घेतल्याचे ई-मेल करून ते सोडविण्यासाठी मदत करा, असे भावनिक आवाहन करून त्यांच्याकडे वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरण्यास सांगून 1 लाख 64 हजार500 रुपयांची फसवणूक केली.