'या'मुळेच १० ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या 'महाराष्ट्र बंद' ला वंचितचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 01:37 PM2020-10-08T13:37:37+5:302020-10-08T13:52:15+5:30
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले..
पुणे: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळलेली असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने, मोर्चे,आंदोलने करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला आता वंचित बहुजन विकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
पुण्यात प्रकाश आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाच्या १० तारखेच्या मोर्चाला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती सुरेश पाटील यांनी केली होती. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजातील विविध संघटनांमध्ये अनेक गट तयार होण्याची शक्यता आहे. त्यापैकीच काहीजण भविष्यात आक्रमक भूमिका देखील घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात राज्यातील सामंजस्य बिघडू नये व त्यामुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठीच वंचित बहुजन विकास आघाडी येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ओबीसी गटातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची काळजी घेतली जावी. आणि दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले. मराठा समाजाला आरक्षण नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी बिनडोक भूमिका त्यांनी मांडली. भाजपने अशा नेत्याला राज्यसभेत पाठवलेच कसे, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.