शिवसेना विरुद्ध बंडखोर, शक्तिप्रदर्शन सुरूच; अनेक ठिकाणी शिंदे समर्थकांचे मोर्चे, राऊतांचा पुतळा जाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:28 AM2022-06-28T07:28:28+5:302022-06-28T07:28:56+5:30
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने जयसिंगपुरातील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांच्या विरोधात गेली तीन दिवसांपासून शिवसैनिक आक्रमक झाले असून, सर्वत्र निषेध मोर्चे काढले जात आहेत. त्याला बंडखोरांचे समर्थकही सरसावले असून, बंडखोरीचे समर्थन करत शक्तिप्रदर्शन केले जात आहे. नंदुरबार, धुळे व जळगाव, सिंधुदुर्गसह विदर्भातही शिवसैनिकांतर्फे बंडखोरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ व बंडखोरांच्या निषेधार्थ शहादा व नवापूर येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले, तर नवापूर येथे आमदार एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना धुळ्यात पाय ठेवू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. तसेच सत्तार आणि एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शिवसेनेच्या वतीने मोर्चे काढण्यात आले.
सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी सोमवारी आमदार अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयावर हल्ला केला. ही घटना निंदनीय असून शिवसैनिकांची ही गुंडगिरी आणि दादागिरी यापुढे खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास आम्हाला जशास तशी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी यावेळी दिला.
जयसिंगपुरात राज्यमंत्री यड्रावकरांविरोधात शिवसैनिकांचा हल्लाबोल
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने जयसिंगपुरातील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी यड्रावकर गटाचे कार्यकर्ते व शिवसैनिक आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला.
एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यड्रावकर यांचे छायाचित्र असलेला फलक व त्यांच्या कार्यालयाकडे जाणारा दिशादर्शक फलक शिवसैनिकांनी उखडून टाकल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. यावेळी पोलीस व शिवसैनिकांत मोठी झटापट झाली.