बंडखोर म्हणतात, हा तर आत्मसन्मानाचा लढा; ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 07:11 AM2022-06-28T07:11:32+5:302022-06-28T07:11:38+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दीपक केसरकर यांनी लवकरच राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा दावा केला.
मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आम्ही शिवसैनिकच आहोत आणि शिवसेनेतच असल्याच्या पवित्रा कायम ठेवला. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसेच सकाळी चारपानी पत्र ट्विट करत गटाची भूमिका विशद केली. ‘बंड नव्हे तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आत्मसन्मानाचा लढा’ असल्याचेही शिंदे गटाने यानिमित्ताने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दीपक केसरकर यांनी लवकरच राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा दावा केला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेतून म्हणजेच महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. आपण ज्या भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जावे. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार यावे आणि हे उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने व्हावे, अशी आमची इच्छा असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात दाखविली जात आहे तशी स्थिती नाही. १०-१२ आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. या १०-१२ आमदारांनाही आमच्यासोबत यावे लागेल. आम्ही काढलेला व्हिप त्यांना मानावा लागेल. आमचा गट म्हणजेच शिवसेना असल्याचे सांगतानाच आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी पुढे जात आहोत. हिंदुत्वाच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहोत, असे केसरकर म्हणाले. राष्ट्रवादीतील काहीजण आता उद्धव ठाकरे यांचे सल्लागार झाले आहेत आणि त्यांनी दिलेले सल्ले त्यांना महत्त्वाचे वाटतात, याचे दु:ख वाटत असल्याचेही केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या अनेकांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली होती. अनेकदा उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही बाब घालण्यात आली. त्यावर चर्चादेखील झाल्या. मात्र, बराच काळ चर्चा होऊनही निर्णय झाले नाहीत. त्यादरम्यान या गटातील काहींना फोडण्याचे प्रयत्नही झाले. आताही आम्ही हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे जाण्याची मागणी करत आहोत. तर आम्हाला गद्दार म्हटले जात आहे. धमक्या दिल्या जात आहेत, पातळी सोडून टीका होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेची ताकद काँग्रेस, राष्ट्रवादी कमी करताहेत
उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री राहावे, असे आम्हालाही वाटत होते; पण आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागला. आमच्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये सत्तेत असलेले घटक पक्ष त्यांचे पुढचे आमदार घोषित करत आहेत. त्यांना ताकद दिली जात आहे, निधी पुरवला जात असल्याचा आरोपही केसरकर यांनी केला.