ठाणे : रविवारी ठाण्यात झालेल्या पावसाने गेल्या पाच वर्षांतील एका दिवसात मुसळधार वृष्टी होण्याचे रेकॉर्ड ब्रेक केले. रविवारी दिवसभरात तब्बल २८५.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात सरासरी ३ हजार मिमी पाऊस पडतो. यंदा जुलैअखेरपर्यंतच २२५०.५० मिमी पावसाची नोंद झाली असल्याने सरासरी पाऊस ३ हजार मिमीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने ठाण्यासह इतर भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु, यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात तर वाढ होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने रेकॉर्ड ब्रेक हजेरी लावून अवघ्या दीड महिन्यात मागील वर्षाची कसर भरून काढली आहे. मागील वर्षी १ आॅगस्टपर्यंत १५७३ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र याच दिवशी २२५०.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा पाऊस सप्टेंबर महिनादेखील गाजवणार, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असल्याने दरवर्षी सरासरी ३ हजार मिमी पाऊस पडण्याचा असलेला प्रघात मोडून यंदा हे रेकॉर्डही मोडेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.दरम्यान, मागील काही वर्षांतील रेकॉर्डही पावसाने मोडले असून मागील २४ तासांत २८५.५० मिमी पावसाची नोंद शहरात झाली आहे. (प्रतिनिधी)>एका दिवसात ठाण्यात पडलेला विक्रमी पाऊस
एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक पाऊस
By admin | Published: August 02, 2016 3:50 AM