माझे 3 लाखांचे विज बिल कमी केले, मग सामान्यांचे का नाही? भाजपा आमदाराचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 09:06 PM2020-09-01T21:06:31+5:302020-09-01T21:07:17+5:30
आमदार गणपत गायकवाड यांनी घेतला आक्षेप, महावितरणने केले 3 लाखांनी बिल कमी
डोंबिवली : लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ बिलं आकारली गेली. नागरिकांनी अनेक आंदोलन केल्यानंतरही विजबील कमी करण्यात आले नाही. मात्र, कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विजबिलातून 3 लाख रुपये कमी करण्यात आले. यावरुन गणपत गायकवाड यांनी महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. आमदाराच्या कार्यालयाचे विजबील कमी होतं, मग सर्वसामान्य नागरिकांचे विजबिल का कमी होत नाही? असा सवाल आमदारांनी उपस्थित केला.
आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाचे महावितरणाने तब्बल 5 लाख रुपयांचे विजबील पाठवले होते. इतकी मोठी रक्कम पाहून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी बिलातून तब्बल 3 लाख रुपये कमी केले. त्यामुळे गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत.
“आमदाराला तुम्ही 3 लाख रुपये कमी करुन देत आहात. मग सर्वसामान्य नागरिकांना 200, 400 किंवा 500 रुपये का कमी करुन देत नाहीत? महावितरणाचा भोंगळ कारभार सर्वांना दिसून येतोय”, अशी टीका गणपत गायकवाड यांनी केली.
“मी आमदार आहे. कार्यालयात काहीतरी विचारणा करेल, गोंधळ घालेल, या भीतीने बिलातून 3 लाख कमी केले. आमदाराच्या कार्यालायचे बिल होते म्हणून तत्काळ कारवाई झाली. पण सर्वसामान्यांचे काय?”, असा सवाल गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला.
“सर्वसामान्य जनता महावितरणाच्या कार्यालयापर्यंत पोहोचत नाही. काही नागरिक तिथे पोहोचले तर अधिकारी काहीतरी हिशोब दाखवतात. जे बिल आलंय ते भरा. मीटरमध्ये काही प्रोब्लेम असेल तर आम्ही नंतर बघू, असं अधिकारी सांगतात”, असं गणपत गायकवाड म्हणाले.
“महावितरणाच्या भोंगळ कारभारावर सर्वसामान्य जनता संतापली आहे. काही दिवसांपूर्वी मी माझ्याच कार्यालयात महावितरणाचा कॅम्प लावला होता. लोकांचं विजबील कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.