मुंबई - बाळासाहेबांच्या सुरक्षेसाठी रात्र जागवली, गाडी लावून पहारा द्यायचो. बाळासाहेब आमचे दैवत होते. त्यांचे नाव घ्यायला उद्धव ठाकरेंच्या परवानगीची गरज नाही. दोनदा उद्धव ठाकरे घरातून निघून गेले होते. बाळासाहेबांचं आरोग्य बिघडायला जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत. बाळासाहेबांना त्रास देणारे उद्धव ठाकरेंच असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
नारायण राणे म्हणाले की, आम्हाला उद्धव ठाकरेंचा स्वभाव आवडला नाही म्हणून बाहेर पडलो. बाळासाहेबांवर आम्ही कधीच नाराज नव्हतो. अनेक गोष्टी आहेत परंतु मला बोलायचं नाही. मातोश्रीतील भिंत, आतल्या गोष्टी सगळ्या माहिती आहे. आदित्य ठाकरेंनी टीका थांबवावी. तुमचे अनेक सूडबुद्धीचे निर्णय आम्ही पचवले आहेत. जे जे माझ्या अंगावर आले त्यांची सगळी माहिती पोलिसांना आहे. वडिलांना जपता आलं नाही. कुणाच्या जीवावर बेतू नका. केले ते कारस्थान बस्स झाले. आता शिवसैनिकांचे डोळे उघडले आहेत असं राणेंनी सांगितले.
तसेच २० मिनिटांपेक्षा जास्त चालू शकत नाहीत. ते महाराष्ट्रात काय फिरणार? प्रेम आणि विश्वास उद्धव ठाकरेंचा कुणावर नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेला भवितव्य नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगात खोटारडेपणा आणि कपटपणा आहे. वडील म्हणून बाळासाहेबांना मान, सन्मान उद्धव ठाकरेंनी केला का? स्मारकाच्या नावाखाली महापौर बंगला हडपला. एक रुपयाचं काम त्यांनी केले नाही. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी विश्वासघात केला, आपल्यापासून वेगळं झाला तर तो गद्दार असतो अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला.
बाळासाहेबांना शब्द दिला होता...मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर १-२ वर्षांनी बाळासाहेबांचा फोन आला. मी कणकवलीच्या घरी होतो. माझा नेपाळी सेवक आहे त्याच्या फोनवर आला होता. बाळासाहेबांच्या घरी थापा सेवक होता त्याने त्याच्या फोनवरून केला होता. तो सेवक धावत आला म्हणाला साहेबांचा फोन आहे. मी विचारलं कोण साहेब, तर मातोश्री सांगितले. मी फोन घेतला. समोरून बाळासाहेब बोलले जय महाराष्ट्र, मीपण म्हटलं जय महाराष्ट्र, काय करतोय, सगळ्यांची चौकशी केली. सगळे कसे आहेत असं विचारलं. साहेबांनी मला सांगितले शिवसेनेत आपण हे केले. तूपण भरपूर काय केले मी विचारलं साहेब तुम्हाला अपेक्षित काय आहे? मी तर पुन्हा येणार नाही परंतु तुम्हाला अपेक्षित काय आहे असं विचारल्यावर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंबाबत एक शब्द माझ्याकडून घेतला. ते मी इथं सांगणार नाही. माझ्याबाबत ते काहीही बोलले तरी वाकड्या नजरेने मी त्यांच्याकडे पाहणार नाही. माझ्या सुपाऱ्या उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. परंतु मी काहीही करणार नाही असं बाळासाहेबांना शब्द दिला होता.
उद्धव ठाकरेंना खोचक शुभेच्छामाननीय उद्धवजी, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हाला उत्तम आणि दिर्घायुष्य मिळो, आमच्यासारख्या साहेबांच्या कडवट कार्यकर्त्याची सुपारी देण्यासाठी हे आयुष्य तुम्हाला उपयोगी पडो. माझ्यासारखे शिवसैनिक तुम्हाला पुरुन उरतील हेदेखील उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं अशा शब्दात नारायण राणेंनी खोचक शुभेच्छा दिल्या आहेत.