Oxygen : महाराष्ट्रासाठी रिलायन्सकडून ऑक्सिजन, १०० मेट्रिक टन अतिरिक्त पुरवठा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 05:37 AM2021-04-16T05:37:13+5:302021-04-16T05:37:50+5:30
Oxygen : गेल्या काही दिवसांत ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच पेशंट्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणीदेखील प्रचंड वाढली आहे.
ठाणे : राज्यातील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्यातील अडचणी दूर करतानाच सध्या असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन रिलायन्स कंपनीला वाढीव ऑक्सिजन देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार रिलायन्सच्या जामनगर प्लान्टमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवण्यात येणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली.
गेल्या काही दिवसांत ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच पेशंट्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणीदेखील प्रचंड वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी नक्की काय करता येईल, याचा आढावा शिंदे यांनी तळोजातील लिंडे कंपनीसोबतच्या आढावा बैठकीत घेतला. विभागीय आयुक्त, ठाणे व रायगड जिल्हाधिकारी आणि एफडीए अधिकारी यांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वय साधण्यात येणार आहे.
लिंडे कंपनीकडून सध्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यांच्यासह पुणे, नगर, औरंगाबाद येथेही ऑक्सिजन पुरवठा होतो. या कंपनीत सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने २३० मेट्रिक टन ऑक्सिजन जनरेट होतो. त्यामुळे या कंपनीतून होणारा ऑक्सिजन पुरवठा आणि त्याच वितरण सुरळीत व्हावे तसेच त्यांना येणाऱ्या काही अडचणी तातडीने सोडवण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यात प्रामुख्याने ऑक्सिजन वितरणाचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून नियोजन करणे, ऑक्सिजन पुरवणाऱ्या ट्रकना विशिष्ट भागातून जाताना पोलीस संरक्षण, चालकांना आवश्यक सोयी-सुविधा आणि त्यांचा कोरोना योद्धे म्हणून समावेश करू ४५ वर्षांवरील चालकांचे तत्काळ लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर, पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख उपस्थित होते.
खासगी रुग्णालयांच्या पुरवठा क्षमतेत वाढ
खासगी रुग्णालयांना ज्या छोट्या पुरवठाधारकांकडून ऑक्सिजन पुरवठा
होतो त्यांच्या स्टोरेज आणि पुरवठा क्षमतेत वाढ करण्याचा सूचनादेखील
यावेळी केल्या. यापुढे ऑक्सिजनप्रमाणेच नायट्रोजन पुरवठा करणारे छोटे टँकरदेखील ऑक्सिजन पुरवठ्यासाठी वापरण्याची मुभा शासनाने दिली असल्याने त्याद्वारे छोट्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.