पुणे :आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले उद्योगपती डी एस उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी यांच्यावर आधारित असलेले दोनही धडे वगळण्याचे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे.त्यामुळे डीएसके अभ्यासक्रमातून पूर्ण हद्दपार झाले आहे.
आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात कुलकर्णी हे पत्नी हेमंती यांच्यासह सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीवर आधारित धडा विद्यार्थ्यांना शिकवणे चुकीचे असून सदर धडा पाठ्यपुस्तकातून वगळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. त्यानंतर अनेक शैक्षणिक संघटनांनी विद्यापीठाला हा धडा काढून टाकण्यासंबंधी निवेदन दिले होते.
अखेर या विषयावर विद्यापीठाने परिपत्रक जारी केले असून सर्व महाविद्यालयांना बी कॉम प्रथम आणि तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात असणाऱ्या कुलकर्णी यांच्याशी निगडीत भाग २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून अभ्यासक्रमातून वगळण्यात येत असल्याचे कळवले आहे. यात प्रथम वर्ष बी कॉमच्या मराठी विषयातील अभ्यासक्रमातील मराठी विषयातील डॉ प्र.चि.शेजवलकर यांनी यांनी यशोगाथा शीर्षकाखाली लिहिलेला पान नंबर ६३ ते ६७ तसेच तृतीय वर्ष बी कॉमच्या पुस्तकातील युनिट तीनमधील उद्योपतींवरील लेखातूनही कुलकर्णी यांचा भाग काढून टाकण्यात आला आहे.