जिल्हा परिषद, पंचायत समिती गणांची फेररचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 12:57 AM2016-08-22T00:57:16+5:302016-08-22T00:57:16+5:30
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांची फेररचना होणार आहे.
बारामती : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांची फेररचना होणार आहे. बारामती, भोर, जुन्नर तालुक्यांतील जिल्हा परिषदेची प्रत्येकी एक जागा कमी होणार आहे. तर हवेली तालुक्यात तीन
जागा वाढणार आहेत, अशी
माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, बारामती शहरानजीकचा रूई, तांदुळवाडी, जळोची व बारामती ग्रामीण हा भाग नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे बारामती नगरपलिका ब वर्गातून अ वर्गात गेली आहे.
परिणामी, तालुक्यातील पंचायत समिती गणांची संख्या कमी होणार आहे. लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांची रचना तयार केली जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक रूपरेषेचा आधार घेतला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
।बारामती तालुक्यात
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सात जागा होत्या. त्या आता सहा होणार आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीच्या दोन जागा कमी होणार आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या १४ ऐवजी आता तालुक्यात १२ जागा असणार आहेत.
भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ जागा होत्या. त्या आता ३ असणार आहेत. तसेच जुन्नरची एक जागा कमी होऊन तिथे आता ७ जागा असणार आहेत. हवेली तालुक्यात १० ऐवजी १३ जागा निर्माण होण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली.