बीएआरसीच्या शास्त्रज्ञांचे बोर्डीत लिचीवर संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 03:33 AM2019-06-02T03:33:28+5:302019-06-02T03:33:34+5:30
३० मे रोजी शास्त्रज्ञांनी बोर्डीतील बागायतीमध्ये भेट दिली. त्या वेळी लिचीची फळे सिडलेस करण्याकडे त्यांचा कल दिसून आला. त्यामुळे तिच्या लागवडीचे क्षेत्र विस्तारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : महाराष्ट्रात डहाणू हे लिची उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे. या हंगामी फळाचे उत्पादन बेभरवशाचे आणि नाशवंत असल्याने त्याची लागवड अत्यल्प आहे. मात्र ते जास्त कालावधीपर्यंत टिकविण्याकरिता भाभा अणू केंद्राच्या माध्यमातून शास्त्रज्ञ प्रयत्नशील असून मागील सात वर्षांपासून त्यावर प्रयोग सुरू आहेत. या वेळी ३० मे रोजी शास्त्रज्ञांनी बोर्डीतील बागायतीमध्ये भेट दिली. त्या वेळी लिचीची फळे सिडलेस करण्याकडे त्यांचा कल दिसून आला. त्यामुळे तिच्या लागवडीचे क्षेत्र विस्तारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मराठी विज्ञान परिषदेच्या बोर्डी शाखेच्या अध्यक्षा ऊर्मिला करमरकर यांच्या माध्यमातून २०१२ साली तुर्भे येथील भाभा अणू केंद्राच्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अॅण्ड कोलोबोरेट डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. शरद काळे यांनी पहिल्यांदा लिचीवर संशोधन करण्याचा पहिला प्रयत्न केला होता.
२०१२ सालापासून डॉ. शरद काळे बोर्डीत येऊन लिची उत्पादक सतीश म्हात्रे यांच्या बागायतीत प्रयोग करीत आहेत. या प्रयोगातून नवीन बदल घडून लिची लागवडीचे क्षेत्र वाढल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. - ऊर्मिला करमरकर, अध्यक्षा, मराठी विज्ञान परिषद, बोर्डी शाखा