ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ६ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा राज्याचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही १०वीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून राज्यात ९१.४१ टक्के मुली तर ८७.९८ टक्के मुलं उत्तीर्ण झाली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६.५६ टक्के लागला असून लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८१.५४ टक्के इतका लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल १.९० टक्के कमी लागला आहे.
विद्यार्थ्यांना आज दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचे वाटप १५ जूनला शाळांमध्ये केले जाईल. जुलै महिन्यात दहावीची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. ३९७४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून ६१ शाळांचा निकाल ० टक्के लागला.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्गत १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर व मोबाइलद्वारे दुपारी १ वाजता निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना १५ जूनला दुपारी ३ वाजता गुणपत्रिका, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख व कलचाचणीच्या अहवालाचेही वाटप केले जाणार आहे. जुलै-आॅगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील. या संदर्भातील तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत.
विभागीय मंडळ निहाय निकाल :
पुणे - 93.30%, कोल्हापूर - 93.89 %, मुंबई 91.90 %, नागपुर- 85.34%
अमरावती - 84.99 %, औरंगाबाद 88.05- %, नाशिक - 89.61%, लातूर - 81.54%, कोकण - 96.56.%
या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध :
maharashtra10.jagranjosh.com