मुंबई : राज्य सरकारची वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे सांगत आंदोलन मागे घेत असल्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी सांगितले. मात्र, नेत्यांनी आंदोलनातून माघार घेतली असली तरी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आम्ही शुक्रवार सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
गुरुवारी राज्यात ३४० एसटी धावल्या. एसटी कामगारांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. आता पुढील निर्णय त्यांनीच घ्यावा. सध्या विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, संप आम्ही चिघळवल्याचा आरोप निराधार असल्याचे आमदार पडळकर म्हणाले.