मोदींचं कमळ नकोय तर, मग 2 हजार रुपये परत करा : सुजय विखे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 05:47 PM2019-10-05T17:47:57+5:302019-10-05T17:57:11+5:30
अनेक नेते विरोधकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. तर काही नेते विकासाच्या मुद्दावर बोलताना दिसत आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर आता वाढतच चालला आहे. अनेक नेते विरोधकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. तर काही नेते विकासाच्या मुद्दावर बोलताना दिसत आहेत. यातच काही नेत्यांकडून अजब वक्तव्य करण्यात येत आहे. अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही असाच अजब सवाल कर्जत-जामखेड मतदार संघातील सभेत उपस्थितांना केला.
सुजय विखे यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉजीट जप्त झाले पाहिजे, असं काम करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा उल्लेख केला. रोहित पवारांच्या सभेला जाणाऱ्यांना मोदींचे दोन हजार चालतात, मग मोदींच कमळ का चालत नाही, असा अजब सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.
रोहित पवारांना अनेक युवक जाऊन पाठिंबा देत आहेत. त्यामुळे तुम्ही गोंधळून जावू नका, असा सांगताना विखे पाटील म्हणाले की, राम शिंदेजी तुम्ही रोहित पवारांच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढा. याच लोकांच्या खात्यावर सरकारने दोन हजार रुपये टाकलेले आहेत. यांना मोदींचे दोन हजार रुपये चालतात. मग कमळ का चालत नाही. दोन हजार नको असतील तर घेऊ नका ते 2 हजार रुपये आम्ही गरीब जनतेसाठी वापरू अस सुजय विखे म्हणाले.