RSS Mohan Bhagwat: भारतातील घटता प्रजनन दर हा चिंतेचा विषय असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी गंभीर इशारा दिला. ज्या समाजाचा प्रजनन दर घटतो, तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो, असे मोहन भागवत म्हणाले. नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक भागवत बोलत होते.
मोहन भागवत यांनी घटत असलेल्या प्रजनन दराकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. सरसंघचालक म्हणाले, "लोकसंख्येत झालेली घट हा चिंतेचा विषय आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान असं सांगतं की, जेव्हा समाजाचा प्रजनन दर २.१ टक्क्याखाली जातो, तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो."
समाज आणि भाषाही नष्ट होते -सरसंघचालक
"कोणतीही प्रतिकुल परिस्थिती नसताना तो समोर उद्ध्वस्त होतो. त्याबरोबर अनेक भाषा आणि समुदायही नष्ट होतात. त्यामुळे लोकसंख्या प्रजनन दर २.१ टक्क्यांच्या खाली जाता कामा नये", असे भाष्य मोहन भागवत यांनी केले.
सरसंघचालक पुढे म्हणाले, "आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ ला निश्चित केले गेले. त्यात असेही म्हटले होते की, समाजाचा लोकसंख्या २.१ टक्क्यांच्या खाली जाता कामा नये. आपल्याला त्यापेक्षा जास्त हवा आहे. दोन किंवा तीन. हेच लोकसंख्या विज्ञान सांगते. संख्या खूप महत्त्वाची आहे कारण समाज टिकला पाहिजे", असे आवाहन त्यांनी केले.