Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हिने माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत राज्य महिला आयोगाला अर्ज केला होता. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आता अर्जाची दखल घेत मुंबई पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. रुपाली चाकणकर यांनी स्वत:ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,"मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे, असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करुन श्रीमती चित्रा वाघ यांनी केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरता अर्जदार यांना मारहाण करण्याच्या धमक्या प्रसार माध्यमांकडून जाहिरपणे दिल्या आहेत."
उर्फी जावेदच्या या तक्रारीची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 'मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे.त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.' असे ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
उर्फीच्या कपड्यांवर वारंवार आक्षेप घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. मला धमक्या देण्याची गरज नाही. मी फक्त इशारा दिला असल्याचे याप्रकरणी प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अशी उघडी नागडी फिरू नको एवढेच माझे म्हणणे असून, असे म्हणणे धमकी आहे का?, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले होते.