कल्याण : डोंबिवली पूर्वेतील केळकर रोडवरील ‘गुरूदेव बार अॅण्ड रेस्टॉरन्ट’च्या बेकायदा शेडवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’ प्रभाग कार्यालयाने मंगळवारी कारवाई केली. या शेड संदर्भात आॅक्टोबर २०१५ मध्ये पालिकेकडे तक्रार आली होती. चौकशीअंती ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी स्वाती गरूड यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई झाली.‘गुरूदेव बार अॅण्ड रेस्टॉरन्ट’च्या चालकाला बेकायदा शेडसंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या. यात संबंधित बांधकाम बेकायदा आहे की नाही, याबाबत कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. परंतु, बांधकाम अधिकृत असल्याचा पुरावा सादर करता आला नाही. दरम्यान २३ जूनला अखेरची नोटीस बजावून २० दिवसांत बांधकाम स्वत:हून काढावे; अन्यथा: ते तोडले जाईल, असा इशारा केडीएमसीने दिला होता. परंतु, हॉटेल चालकाने ते न काढल्याने मंगळवारी गरूड यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी सहाय्यक आयुक्त लहू वाघमारे, ‘फ’ प्रभाग अधिकारी श्वेता सिंगासने व ‘ई’ प्रभागाचे प्रभाकर पवार उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा फौजफाटा होता. विशेष म्हणजे, आॅक्टोबरमध्ये या शेड संदर्भात तक्रार दाखल झाली होती. परंतु, १० महिन्यानंतर कारवाई करण्यात आली. या शेड संदर्भात आलेल्या तक्रारीवर नगरसेवक मंदार हळबे यांनीही कारवाईसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
‘त्या’ शेडवर हातोडा
By admin | Published: August 03, 2016 3:25 AM