“फडणवीसजी, संभाजी भिडे हे गुरुजी नाहीत, तरुणांची माथी भडकवणारे शकुनी मामा आहेत”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:19 PM2023-08-03T16:19:39+5:302023-08-03T16:20:43+5:30
काय अडचण आहे, संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्त्वाकरिता काम करतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
Sambhaji Bhide Guruji: शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने केल्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधकांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी, अटक व्हावी, ही मागणी लावून धरली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावरून आता टीका करण्यात आली आहे.
संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये एक भाषण केले, त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले आणि त्यातील आशयावरुन काही कमेंट केल्या आहेत. डॉ. एक. के नारायणचार्य आणि घोष यांची ही दोन पुस्तके आहेत, ते काँग्रसेचे नेते आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे गुरुजी यांनी सहकाऱ्यामार्फत उद्गृत केला. अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे गुरुजी व दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, असे सांगताच गुरुजी म्हणण्यावरून आक्षेप घेण्यात आला. यावर, ते आम्हाला गुरुजी वाटतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. यावर आता रिपाइंचे सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांच्यावर सडकून टीका केली.
संभाजी भिडे हे गुरुजी नाहीत, शकुनी मामा आहेत
महाराष्ट्रात संभाजी भिडे सातत्याने भडकाऊ विधान करताना दिसत आहेत. संभाजी भिडे शिव प्रतिष्ठान संघटनेच्या नावाखाली तरुणाची माथी भडकवण्याच काम राज्यात करताना दिसतात. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रालाच नाही, तर भारताला समानतेचा विचार दिला. पण तो समानतेचा विचार सांगण्याऐवजी संभाजी भिडे तरुणांची माथी भडकवण्याच काम करताना दिसतात. ज्या प्रमाणे शकुनी मामा माथी भडकवण्याचे काम करायचा, तेच काम हे आधुनिक शकुनी मामा संभाजी भिडे करतायत. देवेंद्र फडणवीस आपणास एक विनंती आहे, संभाजी भिडे हे गुरुजी नसून, आधुनिक शकुनी मामा आहे, हे लक्षात घ्या, या शब्दांत सचिन खरात यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, काय अडचण आहे, त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्त्वाकरता काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या गडकिल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात, हे कार्य चांगले आहे. तसेच वीर सावरकर यांच्यावरही आक्षेपार्ह लिखाण केले जात आहे, काँग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रात लिहिले होते की, वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलिंगी होते. ते स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. त्यामुळे, या शिदोरीवरही गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनात म्हटले.