"...मग तिथे 'सेटिंग' का होत नाही?"; बाबा आढावांना सदाभाऊ खोतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 11:04 AM2024-12-01T11:04:02+5:302024-12-01T11:06:17+5:30
Baba Adhav News: विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यात आंदोलन केलं.
Baba Adhav: ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित होत असून, पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण सुरू केलं होतं. शनिवारी त्यांनी उपोषण मागे घेतलं. बाबा आढाव यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल भूमिका मांडतांना गंभीर आरोप केला. त्यावरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी बाबा आढाव यांना उलट सवाल केला आहे.
"निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे.. पैसे वाटप करणाऱ्या योजनेवर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण झालं आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला. ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे राज्यात वेगळा निकाल लागला", असा गंभीर आरोप बाबा आढाव यांनी केला.
सदाभाऊ खोत काय बोलले?
बाबा आढाव यांनी मांडलेल्या भूमिकेला आणि आरोपाला आमदार सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले. सदाभाऊ खोत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
"बाबा आढाव साहेब, सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामांचा मला आदर आहे; तरी आपण ईव्हीएमवर टीका करण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावी. मुस्लिम बहुल भागात ईव्हीएम मशीन महाविकास आघाडीसाठीच कशी काय सेट होते? तिथे महायुतीला कमी मते मिळतात, मग तिथे 'सेटिंग' का होत नाही? असे प्रश्न आता जनतेला पडले आहेत", असे सदाभाऊ खोत म्हणाले.
"जनतेचा कौल पचवता आला नाही की, अशा आरोपांचा आधार घेतला जातो. विज्ञान युगात अशा निराधार आरोपांनी लोकशाहीची विश्वासार्हता कमी होत नाही, तर आरोप करणाऱ्यांची होत असते", असे उत्तर सदाभाऊ खोत यांनी बाबा आढाव यांना दिले आहे.
विधानसभा निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा ऐरणीवर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. काँग्रेसचे नेते या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या काँग्रेसचे नेतेही ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. निवडणूक आयोगाने आता काँग्रेसच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवले आहे.