कर्नाटकच्या हापूसची ‘देवगड’ म्हणून विक्री
By Admin | Published: May 7, 2014 12:31 AM2014-05-07T00:31:51+5:302014-05-07T00:32:10+5:30
औरंगाबाद : हातगाडीवर, टोपलीत गवत टाकून ‘गावरान आंबे’ असे ओरडत विक्रेते गल्लोगल्ली आंबे विक्री करीत आहेत. मात्र, सावधान गावरान आंब्याच्या नावाखाली लालबागचा आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे.
औरंगाबाद : हातगाडीवर, टोपलीत गवत टाकून ‘गावरान आंबे’ असे ओरडत विक्रेते गल्लोगल्ली आंबे विक्री करीत आहेत. मात्र, सावधान गावरान आंब्याच्या नावाखाली लालबागचा आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. एवढेच नव्हे तर देवगडचा हापूस आंबा असे सांगत कर्नाटकचा हापूस विकला जात आहे. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असून, आंबा खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नवीन पिढीला जसे की, सरबती, नर्मदा किंवा एचएमटी गव्हातील फरक कळत नाही. त्याचप्रमाणे सुगंधी चिन्नोर तांदूळ कोणता हे कळणे कठीण जाते तशीच आंब्याच्या बाबतीतही अनेक जणांची फसगत होत आहे. बाजारात हापूस, केशर, लालबाग, पायरी, बदाम, बेनिशान या जातींची आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. ते कार्बाईडने रात्रीतून झटपट पिकविण्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीतून पुन्हा एकदा उजेडात आला. आता आंबा विक्रेते गावरान आंब्याच्या नावाखाली लालबागचा आंबा विकत असल्याचेही उजेडात आले आहे. अक्षय तृतीयेपासून बाजारपेठेत आंब्याला मोठी मागणी वाढली आहे. शहरात आंध्र प्रदेश, कर्नाटक व गुजरातमधून दररोज ४० ते ५० टन आंब्याची आवक होत आहे. यात आंध्र प्रदेशातून लालबाग आंबाही मोठ्या प्रमाणात येत आहे. आंब्याचे अनेक प्रकार असले तरीही गावरान आंब्याची गोडीच न्यारी असते. यामुळे ग्राहकांचा ओढा गावरान आंब्याकडे जास्त असतो. मागील काही वर्षांत गावरान आंब्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, शहरात गावरान आंब्याला चांगला भाव मिळतो. लहान आकारातील हिरव्या रंगात आंबा असतो. खाण्यास आंबट, गोड अशी चव असते. यंदा बाजारपेठेत लालबागचा आंबा लहान आकारात मोठ्या प्रमाणात आला आहे. याच आंब्याला गावरान म्हणून विकले जात आहे. देवगड येथील हापूस आंबा औरंगाबादेत विक्रीसाठी येतच नाही. तो विक्रीसाठी विदेशात किंवा मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या महानगरात जातो. मात्र, शहरात देवगडचा हापूस म्हणून सर्रास कर्नाटकचा हापूस विकला जात आहे. यासंदर्भात एका आंबा विक्रेत्याने सांगितले की, मागील आठवड्यात युरोपात हापूसला बंदी घातल्याने मुंबई मार्केट यार्डमध्ये ५०० पेटी हापूस पडून होता. हा हापूस विक्रीसाठी राज्यभर पाठविला. त्यातील काही पेट्या शहरात आल्या. त्या हापूसमध्ये कर्नाटकचा हापूस मिसळून सर्रास देवगडचा हापूस म्हणून विक्री केली जात आहे. हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, आंब्यामध्ये ५० पेक्षा अधिक व्हरायटीज आहेत. आंबा उत्पादक व तज्ज्ञच या संपूर्ण व्हरायटीज ओळखू शकतात. नवीन पिढीला मात्र कर्नाटकचा वा देवगडचा हापूस यातील फरक कळणे कठीणच आहे. तसेच लहान आकारातील लालबागचा आंबा व गावरान आंबा यातील फरकही माहिती नाही. ग्राहकांच्या याच अज्ञानाचा फायदा काही फळ विक्रेते घेतात. याकरिता नेहमीच्या विश्वासू फळ विक्रेत्याकडूनच आंबे विकत घ्यावेत.