कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या दोन दिवशीय महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्याच दिवशी अचानक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापकचे प्रमुख संभाजी भिडे यांनी उपस्थिती लावली. यामुळे चर्चांना उधाण आले होते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट न झाल्याने ते माघारी फिरले आहेत.
शिवसेनेच्या महाअधिवेशनाला अनेक पक्ष प्रवेश होणार असल्याचा दावा केला जात आहे. तसेच पक्षाने सदस्य नोंदणीलाही सुरुवात केली आहे. याद्वारे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गट ताकद दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना संभाजी भिडे यांनी उपस्थिती लावली होती.
एकनाथ शिंदे अद्याप अधिवेशनाला पोहोचलेले नाहीत. त्यांना भेटण्यासाठी संभाजी भिडे अधिवेशनस्थळी आले होते. त्यांची भेट झाली नसल्याने ते माघारी परतले आहेत.
यायला लागतंय या टॅगलाईन खाली हे अधिवेशन असणार आहे. शिवदूतची स्थापना या अधिवेशनात केली जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरात येऊन आईंचा आशीर्वाद घेऊन प्रचार शुभारंभ करायचे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन होणार आहे.