Chhatrapati Sambhaji Raje News: गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे बॅनर राज्यभरात लागल्याचेही पाहायला मिळाले. यातच संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यात मराठा आरक्षणासह धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यातच अनेकविध मुद्द्यांवरून राज्यात आंदोलने सुरू आहेत. सारथीच्या प्रश्नांसंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट संभाजीराजे यांनी घेतली.
सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावे, यांसारख्या मागण्यांसाठी फेलोशिप विद्यार्थी तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर विभागाचे प्राध्यापक सहभागी झाले आहेत. या आंदोलकांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. त्यावेळी संभाजीराजेंनी घेतलेली सारथी आंदोलकांच्या भेटीदरम्यान केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे.
मला मुख्यमंत्री करा मग, प्रश्न चुटकीत संपवतो
आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करताच, मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न सोडवतो, असे विधान संभाजीराजे यांनी केले. संभाजीराजे यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत संभाजीराजे यांनी पहिल्यांदा विधान केलेले नाही. यापूर्वीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा संभाजीराजे यांनी बोलून दाखवली आहे.
दरम्यान, या आंदोलनाला संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.