Samruddhi Mahamarg Accident, Jayant Patil: समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी पहाटे मोठी दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने २० मजूर ठार झाले. तर क्रेन आणि स्लॅब खाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या दरम्यान, तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले. या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर सरकारचा सडकून समाचार घेतला.
"ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या सरलांभबे गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बांधला जाणारा पूल कोसळूल १६ कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृत बांधवांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली तसेच एनडीआरएफमार्फत शोधकार्य सुरू असून इतर कामगार सुखरूप बाहेर यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शासनाने मागच्या अपघातातून कोणताही धडा घेतलेला नाही हे या अपघातातून सिद्ध होते. समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात पाहता शासनाने यात ठोस धोरण आखले पाहिजे. मदत जाहीर करून जबाबदारी झटकून चालणार नाही," असे पाटील यांनी ट्विट केले.
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्याठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास देखील समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते. त्यावेळी शाहपूर सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर आणि क्रेन अचानक कोसळली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन खाली असलेल्या मजूरांवर कोसळली. यात २० मजूरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तर जखमी मजुरांवर उपचार सुरु आहेत.