सांगलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिसाशी झटापट; कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 08:30 PM2018-09-26T20:30:08+5:302018-09-26T20:35:00+5:30
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधान बचाव सभेचे पोलिसाने चित्रीकरण केल्यामुळे सांगलीत बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
सांगली : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधान बचाव सभेचे पोलिसाने चित्रीकरण केल्यामुळे सांगलीत बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसाशी त्यांची झटापट झाल्यानंतर कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्नही झाला. शेवटी पोलिसाने चित्रीकरण कॅमे-यातून हटविल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
सांगलीच्या राजमती भवनात बुधवारी दुपारी चार वाजता संविधान बचाव अभियानाअंतर्गत राष्ट्रवादी महिला काँग्रेसची सभा आयोजित केली होती. आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्या उपस्थितीत ही सभा होत असल्यामुळे जिल्ह्यातून महिला कार्यकर्त्यांसह पक्षाचे पुरुष पदाधिकारीही मोठ्या संख्येने जमले होते. सभेला सुरुवात झाल्यानंतर खाकी वर्दीतील एका पोलिसाने चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, प्रदेश चिटणीस ताजुद्दीन तांबोळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान आदींनी संबंधित पोलिसाला याबाबत जाब विचारला. चित्रीकरण करण्याचा संबंध काय? निवडणुका नसताना पक्षाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण का ठेवले जात आहे, असे सवाल उपस्थित करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी पोलिसाकडील कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसाने मला आदेश दिल्याप्रमाणे मी काम करीत असल्याचे स्पष्ट केले. शेवटी चित्रीकरण कॅमे-यातून हटविण्याची मागणी करीत कार्यकर्त्यांनी पोलिसाला घेराव घातला.
अर्धा तास हा वाद सुरू होता. त्यानंतर पोलिसाने चित्रीकरण सर्वांसमोर हटविल्यानंतर वाद निवळला आणि कार्यकर्ते शांत झाले. याबाबत ताजुद्दीन तांबोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पक्षाच्या कार्यक्रमात पोलिसांची लुडबूड कशासाठी सुरू आहे, हे कळत नाही. वास्तविक कोणत्याही निवडणुका नसताना हा प्रकार निंदनीय आहे. गेल्या काही दिवसांत पक्षाच्या कार्यक्रमांवर पोलीस वॉच ठेवत आहेत. महिला आघाडीचा हा कार्यक्रम असल्यामुळे किमान महिला कॉन्स्टेबल तरी पाठवायला हवी होती. पुरुष कॉन्स्टेबल येऊन महिलांचे चित्रीकरण करीत असल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. बंदोबस्तासाठी पोलीस असणे ही बाब समजण्यासारखी आहे, मात्र चित्रीकरण करून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रकारातून दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. याबाबत आम्ही तीव्र शब्दात शासनाच्या या कृतीचा निषेध करीत आहोत.
हा दडपशाहीचा प्रकार आहे...
फौजिया खान म्हणाल्या की, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यक्रमात आम्ही मनुस्मृतीला जोडे मारण्याचे आंदोलन करणार होतो. पोलिसांनी मनुस्मृती काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारला या मनुस्मृतीचा आदर करायचा आहे, हे सिद्ध होते. पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण पोलिसांमार्फत करून दडपशाहीचा मार्ग अवलंबिला आहे. आम्ही तो धुडकावून लावू. या देशात हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही.