सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या निर्यातीत दुपटीने वाढ

By admin | Published: April 13, 2017 05:19 PM2017-04-13T17:19:06+5:302017-04-13T17:19:06+5:30

सांगली जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस आणि वातावरणही चांगले राहिल्यामुळे १,५७५ शेतक-यांनी ८७०.५६ हेक्टरवर निर्यातक्षम द्राक्षे केली होती.

In Sangli district, the export of vinegar doubled in the current year | सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या निर्यातीत दुपटीने वाढ

सांगली जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या निर्यातीत दुपटीने वाढ

Next
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 13 - सांगली जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस आणि वातावरणही चांगले राहिल्यामुळे १,५७५ शेतक-यांनी ८७०.५६ हेक्टरवर निर्यातक्षम द्राक्षे केली होती. मात्र निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र दुपटीने वाढल्यामुळे युरोपीयन राष्ट्रांत द्राक्षांचे दर चार किलोच्या पेटीला ८० ते १०० रुपयांनी उतरले आहेत. सध्या तर तापमान वाढल्यामुळे द्राक्षमणी मऊ पडले आहेत. परिणामी निर्यातदार व्यापा-यांनी खरेदीस नकार दिल्यामुळे किरकोळ बाजारपेठेत द्राक्षांची विक्री करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या तीनशे हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे शिल्लक आहेत.
जिल्ह्यात जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे निर्यातदार द्राक्ष बागायतदारांनी छाटणीही उशिरा घेतली. त्यामुळे यावर्षीची द्राक्षाची निर्यातही उशिराच सुरू झाली. चांगला पाऊस आणि वातावरणही पोषक असल्यामुळे शेतकºयांनी निर्यातक्षम द्राक्षे मोठ्याप्रमाणात केली. जिल्ह्यात ३०० ते ५०० हेक्टर क्षेत्रावर असणारे निर्यातक्षम द्राक्षांचे क्षेत्र २०१६-१७ मध्ये ८७०.६५ हेक्टरपर्यंत पोहोचले. त्यातच द्राक्षाची छाटणी उशिरा झाल्यामुळे निम्मा एप्रिल महिना संपला तरीही, निर्यातक्षम द्राक्षे संपलेली नाहीत. आतापर्यंत ८४६ शेतकºयांची ६५५.२९ हेक्टर क्षेत्रातील ८७३४.७५ टन द्राक्षे  ६७० कंटेनरमधून जगातील १९ राष्ट्रांत निर्यात झाली आहेत. अजून २१४.६१ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षे निर्यात करण्याची शिल्लक आहेत.
सध्या सांगलीचा पारा ४१ अंशावर पोहोचला असल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांंचे मणी मऊ पडत आहेत. द्राक्षघडांची तोड केल्यानंतर निर्यातीपूर्वी ती शीतगृहामध्ये ठेवावी लागतात. सध्याच्या तापमानामध्ये तापलेली द्राक्षे शीतगृहात ठेवल्यानंतर काळी पडत आहेत. तसेच भारतातून युरोपीयन राष्ट्रांत द्राक्षे पोहोचण्यास जास्त कालावधी लागत असल्यामुळे मऊ पडलेली द्राक्षे टिकत नाहीत. युरोपीयन राष्ट्रांमध्ये २५ मार्चपर्यंतच द्राक्षाला जास्त मागणी असते. त्यानंतर फारशी मागणी असत नाही. यावर्षी भारतातून द्राक्षाची मोठी निर्यात झाली आहे. त्यामुळे दरही उतरले असल्याचे निर्यातदार व्यापारी सांगत आहेत.
 वाढत्या तापमानामुळे द्राक्षांचा रंगही बदलला असल्याचे कारण देऊन निर्यातदार व्यापारी द्राक्षे खरेदीस नकार देत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकरी मिळेल त्या दराने देशांतर्गतच द्राक्षाची विक्री करू लागले आहेत. स्थानिक बाजारपेठेत निर्यातक्षम द्राक्षाला चांगला दर मिळत नसल्यामुळे द्राक्ष बागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. उशिरा छाटणी घेतलेल्या द्राक्षांची तोड अजून महिनाभर तरी चालण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.
माणिक चमन, ‘सोनाक्का’ला सर्वाधिक मागणी
जिल्ह्यातील द्राक्षे कॅनडा, यु.के., चीन, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका आदी १९ देशांत निर्यात झाली आहेत. पूर्वी तास-ए-गणेश या द्राक्षांना प्राधान्य दिले जात होते. आता काळी द्राक्षेही निर्यात होऊ लागली आहेत. यावर्षी माणिक चमन, सोनाक्का द्राक्षांनाही परदेशात चांगली मागणी होत आहे.
 
द्राक्षातील कीडनाशक अंश कमी करण्यात यश
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षे पाठविण्यासाठी द्राक्षातील कीडनाशक शिल्लक अंश कमी करण्याची गरज असते. युरोपच्या बाजारात भारतीय द्राक्षांना विशेषत: चिलीच्या द्राक्षांशी स्पर्धा करावी लागत असल्याने, रेसिड्यू (द्राक्षातील कीडनाशक अंश), एकमार्क प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र याबाबतीत द्राक्ष बागायतदारांनी विशेष काळजी घेतली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून पाठविलेली सर्व द्राक्षे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पात्र ठरली आहेत.
 
द्राक्षबागांसाठी पोषक हवामान असल्यामुळे यावर्षी द्राक्षांची निर्यात वाढली आहे. महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणात निर्यात झाल्यामुळे त्याचा दरावर परिणाम झाला आहे. मागील हंगामात युरोपमध्ये चार किलोच्या द्राक्षपेटीला २२० ते २६० रूूपये दर मिळाला होता. यावर्षी मागणीच नसल्यामुळे चार किलोच्या पेटीला १४० ते १८० रूपये दर मिळत आहे. अजूनही मोठ्याप्रमाणात द्राक्षे शिल्लक असून ती पाठविण्यासाठी योग्य नाहीत.
- नासिरभाई बागवान, निर्यातदार, मिरज.

Web Title: In Sangli district, the export of vinegar doubled in the current year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.