...म्हणून अजित पवारांवर कडक शब्दात बोललो, त्याचा खेद वाटतो; संजय राऊतांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 11:16 AM2023-06-04T11:16:14+5:302023-06-04T11:17:18+5:30
मी राजेशाहीविरोधात बोललो, आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्याविरोधात आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं राऊतांनी सांगितले.
नाशिक - अजित पवारांबाबत मला अर्धवट आणि वेगळा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिले, त्याचा मला खेद वाटतो, मी असे बोलायला नको होते असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. धरणात मुंतण्यापेक्षा थुंकलेले बरे असं सांगत राऊतांनी अजित पवारांवर शनिवारी प्रहार केला होता. त्यावरून आज राऊतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांबद्दल मला अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला. अजित पवार असे बोलले नव्हतो. माझा आणि अजित पवारांचा स्वभाव सारखा आहे फार पटकन रिएक्ट होतो. महाराष्ट्रात संयमाने वागले पाहिजे, बोलले पाहिजे असं अजित पवार म्हणाले. पण त्यापुढे संजय राऊतांनी खुलासा केला आहे. त्यांची जीभ दाताखाली आली म्हणून ते थुंकले असं त्यांनी सांगितले. पण पत्रकारांनी अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला. त्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात उत्तर दिले. मला त्याचा खेद वाटतो. मी असे बोलायला नको होते असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही सगळे सहकारी आहोत. पवार कुटुंबाशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. अजित पवार हे मविआचे प्रमुख नेते आहेत. जोपर्यंत संपूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही हे मी ठरवले आहे असं स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिले आहे.
नवी संसद भवन ही फक्त इमारत, इतिहास नाही
हा देश २०१४ नंतर निर्माण झालाय असं काही जणांना वाटते. देशाला स्वातंत्र्य २०१४ नंतर मिळालंय असं पसरवणे, हा हजारो क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान केल्यासारखे आहे. १९२७ साली जे संसद निर्माण झाले. त्या संसदेला इतिहास आहे. त्यात घटनाकार, स्वातंत्र्यात सहभागी झालेले अनेक नेते होते. त्या संसदेत चालताबोलता इतिहास आहे. आम्ही इतिहास वाचणारी माणसे आहोत. या संसदेत महान लोक बसून गेले. आम्ही त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत असं आम्हाला वाटायचे. परंतु नवीन इमारतीत ही भावना निर्माण होईल का अशी माझ्या मनात शंका आहे. ज्यापद्धतीची राजवट, धर्मकांड आपण पाहतोय, लोकांना बोलू दिले जात नाही, लिहू दिले जात नाही. लोकांवर दबाव आहे. कायद्याचा गैरवापर करून सरकारे आणली जातायेत. ही हुकुमशाही आहे. नवीन संसद फक्त इमारत आहे इतिहास नाही असं संजय राऊतांनी म्हटलं.
बेईमान, गद्दारांचे इतिहासात काय झाले वाचावे
मी राजेशाहीविरोधात बोललो, आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्याविरोधात आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आंदोलन करण्याआधी गद्दार आणि बेईमान या प्रवृत्तीविषयी काय म्हणणे आहे हे सांगावे. त्या काळात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात बेईमान, गद्दारांना गोळ्या घातल्या आहेत. आम्ही सावरकरांचे उदाहरण दिले. हल्ली गद्दारांचे नाव घेतल्यावर माझी जीभ दाताखाली अडकते ते का कळत नाही. जे आंदोलन करतायेत त्यांनी गद्दारी, बेईमानीबाबत काय झाले त्यासाठी इतिहास वाचावा. शिवशाहीत कडेलोट झाला आहे. या गद्दारांना माहिती आहे. लोकांचा संताप आहे त्यामुळे आंदोलने वैगेरे सुरू आहेत अशी टीका राऊतांनी शिवसेनेवर केली.
आधी निवडणुका घ्या, मग पाहू
५०-५० खोके देऊन सरकार पाडले हे वेगाने काम झाले. इतक्या वेगाने काम कधीच झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही सरकार अजून जागेवरच आहे. वेगाबाबत बोलू नका, आधी निवडणुका घ्या मग कामे दाखवा. निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा असं आवाहन संजय राऊतांनी केले. तसेच अजित पवार, नाना पटोले हे राज्याचे प्रमुख आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले, हा प्रश्न कुणी कुणाचे समर्थन करण्याचा नसतो. समर्थकांचा अतिउत्साह असतो. नेते होर्डिंग्स लावायला सांगत नाही. या प्रश्नांना जास्त महत्त्व देऊ नका असं राऊतांनी सांगितले.