Sanjay Raut News: २२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या राम मंदिर लोकार्पणावरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये एक व्हिडिओ शेअर करत, भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, त्यात माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह लालकृष्ण आडवाणी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्रातील श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वगैरे वगैरे तथाकथिक राम भक्तांसाठी ही ‘स्मरण गोळी’. उगाळून घ्या. आणखी देखील जालीम डोस आहेत. योग्य वेळी देऊच, असे कॅप्शन लिहीत टीका केली आहे.
संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडिओत काय?
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी व बाळासाहेब ठाकरे या तीन नेत्यांच्या मुलाखतींमधला काही भाग एकत्र करण्यात आला आहे. त्यात बाबरी मशीद पाडण्याच्या प्रसंगावर तिन्ही नेते भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत. ६ तारखेला अयोध्येत जे घडले, ते दुर्दैवी होते. ते घडायला नको होते. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला त्यात यश आले नाही. आम्ही त्यासाठी माफी मागतो. कारसेवक नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी असे काही केले, जे व्हायला नको होत, असे अटल बिहारी वाजपेयी म्हणताना दिसत आहेत.
माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस म्हणेन
माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस म्हणेन. ती एक गंभीर चूक होती. त्यात शंकाच नाही. मी आधी उमा भारतीला सांगितले की तिथे जाऊन त्या सगळ्यांना खाली यायला सांग. पण तिने येऊन मला सांगितले की तिथे सगळ्यात वर काही मराठी माणसे आहेत आणि ते माझे ऐकत नाहीत. मग प्रमोद महाजनला पाठवले. प्रमोदही निराश होऊन परत आला, अशी प्रतिक्रिया लालकृष्ण आडवाणी यांनी दिल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शेवटी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखतीचा एक भाग आहे. ती अभिमानाची बाब आहेच. यात कोणतीही शरमेची बाब नाहीये. बाबरी मशीद पाडलेली नाही, त्याच्याखालचे राम मंदिर आम्ही वर आणले आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.