मुंबई – समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडून घेतल्या. त्या रस्त्यावरील अनेक लहान लहान उद्योग, फळबागा उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यांचे श्राप आहेत. सबुरीने घेता आले असते. परंतु ज्यारितीने हा महामार्ग घाईघाईने बनवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा परिणाम निरपराध जनता भोगतेय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावरून भाजपावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत गेल्या वर्षभरात इतके भीषण अपघात या रस्त्यावर झालेले आहेत. या अपघातांची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्ता आम्ही बनवला म्हणून श्रेय घ्यायला पुढे होते. आम्ही केला सांगत होते. मग त्या रस्त्यावर जे रक्त सांडतंय, बळी जातायेत त्याचीही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. अजूनही त्या महामार्गावर काही सुधारणा करून जर लोकांचे प्राण वाचवता आले तर पाहावे. इतका रखरखीत महामार्ग या जगात कुठे दिसला नाही. कुठे थांबा नाही, लोकांच्या विश्रांतीची जागा नाही, काहीच नाही असा आरोप त्यांनी केला.
त्याचसोबत मागे या महामार्गावर बस जळाली आणि ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा आम्ही सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. समृद्धी महामार्गावर रोज लोकांच्या हत्या होतायेत. या सरकारी हत्या आहेत. संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? हे मंत्री टोलचे राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे धावतायेत. मग इथं कोण जाणार? संबंधित मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही खासदार संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे राजकारण करतायेत, छगन भुजबळ राजकारण करतायेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांची वक्तव्ये तपासून घ्यायला हवीत. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ असं फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला आरक्षण देईन असं शिंदे म्हणाले. आज मराठा समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाच्या मूक मोर्चात हे उतरले होते. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला मुदत दिलीय. तुम्ही काय करणार आहात. याउलट तुम्ही महाराष्ट्रातील वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करताय. छगन भुजबळ यांची विधाने राज्यातील समाजासमाजात फूट पाडण्याची आहेत. हा विषय अत्यंत संयमाने हाताळला पाहिजे. राज्यातील घटकांना अस्वस्थ करून एकतेला आग लावता येणार नाही असा आरोपही संजय राऊतांनी केला.