मुंबई – सरकारला आरक्षण द्यायचंय की नाही हे स्वत:ला मराठा समजणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समोर येऊन सांगायला हवं. आरक्षणासाठी आज तिसरी आत्महत्या झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १ महिन्याची मुदत दिली होती. त्यात सरकारने प्रक्रिया करावी आणि आम्हाला आरक्षण द्यावे असं त्यांनी म्हटलं. ही मुदत आता संपतेय. १ महिन्याच्या काळात गरीब मराठा युवकांनी आत्महत्या केल्या पण सरकारच्या डोळ्याची पापणीही हलली नाही. मराठा चेहरा आणि मतांसाठी तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलंय, मग तुम्ही काय करताय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदे भाजपाला दिलेला शब्द पाळतात, पक्षात फूट पाडणे, बिल्डरांना दिलेला शब्द पाळतात. मराठा समाजाला दिलेला शब्द पाळत नाही. नरेंद्र मोदींसोबत त्यांचा फोटो आहे. मोदींना जाऊन भेटा, कायद्यात दुरुस्ती करा असं सांगा, लाडके आहात ना, मग दिल्लीत जा त्यांच्या दारात बसा. मनोज जरांगे पाटील यांना घेऊन मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मोदींकडे जावे आणि येताना कायद्यात दुरुस्ती झाल्याचे कागदपत्रे घेऊन यावेत. मराठा समाजातील तरुणांचे आणखी किती बळी घेणार आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच महाराष्ट्राचे नागरीक आहेत, मराठी मुले आहेत, जातनंतर...ही मुले मरतायेत हे आम्हाला पाहवत नाही. जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातायेत. जाहिरातीसाठी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं नाही. फोटोबाजी तुमच्याकडे ठेवा. मराठा आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. तुमच्या सरकारमधले काही लोकं जे वेगळ्याच दिशेने भूमिका घेऊन चाललेत, राज्यात दिवाळी आधी वातावरण बिघडू शकते. छगन भुजबळ हुलकावण्यात देतायेत, लोकांना भडकवायेत. शिंदे गटातील काही आम्ही कुणबी नाही, ९६ कुळी मराठा आहे. असं बोलतायेत. काँग्रेसमधील काही नेते त्यांची वेगळी भाषा आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी सधन मराठ्यांनी रणनीती आखलीय का? हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे. त्यात बाधा आणली जातेय त्यामुळे मराठा तरुण वैफल्यग्रस्त होतायेत आणि आत्महत्या करतायेत. याला जबाबदार राज्य सरकार आहे. आज ३ आत्महत्या झाल्यात, उद्या चौथी झाली तर मराठा समाजाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे