"प्रिय संजय राऊत साहेब, हिसाब तो देना पडेगा.."; किरीट सोमय्यांचे खोचक ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:45 PM2022-06-27T13:45:08+5:302022-06-27T13:46:07+5:30
संजय राऊतांना उद्या ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Sanjay Raut vs Kirit Somaiya: शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला दिवसेंदिवस मोठे धक्के बसत आहेत. या धक्क्यांच्या मालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा समजले जाणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही नवा धक्का बसला आहे. पत्राचाळ प्रकरण आणि पर्ल ग्रुप प्रकरण या प्रकरणांमध्ये संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत होते. त्यातच ईडीकडून संजय राऊत यांना समन्स बजावण्यात आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांना उद्देशून एक ट्वीट करत निशाणा साधला.
राज्यात सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचला असताना शिवसेनेचे एक-एक आमदार गुवाहाटीला जाऊन शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेनेचे इथे असलेले आमदार काहीसे मवाळ भूमिकेतच आहेत. पण शिवसेनेवर आलेल्या या संकटाला रोजच्या रोज तोंड देणारे खासदार संजय राऊत विविध विधान करताना दिसत आहेत. याच दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले असून उद्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलंय. यावर किरीट सोमय्यांनी राऊतांना डिवचले आहे. "प्रिय संजय राऊत साहेब, तुम्ही मला, माझ्या पत्नीला, माझा मुलगा नीलला, माझ्या आईला..... कोणालाही जेलमध्ये टाकायचे प्रयत्न करा, धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या... परंतु "हिसाब तो देना पडेगा", अशा शब्दांत त्यांनी संजय राऊतांना डिवचल्याचे दिसत आहे.
संजय राऊत साहेब,
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 27, 2022
तुम्ही मला, माझा पत्नी ला, माझा मुलगा नील ला, आई ला.....
जेल मध्ये टाकायचे प्रयत्न करा....
धमक्या द्या,
हल्ले करा
शिव्या द्या....
परंतु
"हिसाब तो देना पडेगा " @BJP4India@BJP4Maharashtra
--
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavispic.twitter.com/jA1QcvzP7a
दरम्यान, संजय राऊतांना ईडीचे समन्स बजावण्यात आल्याचे समजल्यानंतर राऊतांनी देखील एक ट्वीट करत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही. या मला अटक करा! जय महाराष्ट्र!", असे ट्वीट संजय राऊतांनी केले असून त्यात देवेंद्र फडणवीसांना थेट टॅग केले आहे.