"बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 01:29 PM2022-12-24T13:29:13+5:302022-12-24T13:30:01+5:30
खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही असा दावा मंत्री संदीपान भुमरेंनी केला.
औरंगाबाद - संजय राऊत केवळ आरोप करतात. ५० खोके आरोप करून चालत नाही तर ते सिद्ध करावं लागते. काही चौकशी करायची ती करा. फक्त बदनाम करण्याचं काम राऊत करतात. राऊतांना काय आरोप करायचे ते करू द्या. जनता आमच्यासोबत आहे. संजय राऊतांच्या पायाखालची जमीन सरकलीय. बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय असा टोला मंत्री संदीपान भुमरे यांनी राऊतांना लगावला.
संदीपान भुमरे म्हणाले की, खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही. सभागृहात यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जनतेसमोर एकनाथ शिंदेंना बदनाम करायचं. कुठेतरी चर्चा वेगळ्या दिशेला न्यायची म्हणून हा विषय विरोधकांनी हाती घेतलाय. युती शासनाला बदनाम करण्याचं काम विरोधकांकडे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ग्रामपंचायत निकालात सगळ्या युतीच्या ग्रामपंचायती आल्यात. ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे. जनतेचा त्यांच्यावर किती विश्वास आहे हे लक्षात आलं असेल. नुसतं आरोप करून चालत नाही तर काम करून दाखवायचं असतं. एखादा खोका घेतलाय ते सिद्ध करा. विमानातून खोके आणता येतात का? हा उठाव वेगळ्या कारणाने झालाय. २०२४ मध्ये जनता कुणासोबत हे ठाकरेंना कळेल. पैठण विधानसभा क्षेत्रात १-२ ग्रामपंचायती वगळता सगळीकडे आमची सत्ता आली असंही संदीपान भुमरे म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
मुख्यमंत्र्यावरील आरोप गंभीर आहेत. भूखंड वाटप घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्रातील अनेक प्रमुखांना पाठवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावे दिलेत. बहुतेक देवेंद्र फडणवीस दिल्लीत घाईने आले असतील तर नक्कीच त्यावर चर्चा झाली असेल. ११० कोटींचे भूखंड २ कोटींना आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिलेत. जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भूखंड वाटप घाईघाईने केले. हायकोर्टाने त्यावर ताशेरे मारलेत असं सांगत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केला.
त्याचसोबत जे ४० आमदार ज्याप्रकारे ५०-५० खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्यावर SIT स्थापन करणं गरजेचे आहे. पण जे विषय संपलेले आहे त्यावर SIT स्थापन करून सत्तेचा, पोलिसांचा गैरवापर सुरू आहे असा आरोपही राऊतांनी केला.