Sanjay Raut over Panauti Remark : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच एका जाहीर सभेत एक विधान केले. भारतीय संघ सलग १० सामने जिंकला होता, पण फायनलमध्ये पनौती आली आणि भारतीय खेळाडू पराभूत झाले, अशा आशयाचे ते विधान होते. या विधानावर भाजपातील काही नेतेमंडळींनी आक्षेप घेतला. देशाच्या पंतप्रधानांबाबत असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे म्हणत भाजपानेराहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. पण, राहुल गांधींनी कोणाचेही नाव घेतले नव्हते, असे म्हणत काँग्रेसकडून भाजपालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. तशातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पनौती शब्दाबाबत विधान केले.
२०१४ सालापासून या देशाला पनौतीची पीडा सुरू झाली आहे. आम्ही हे एखाद्या व्यक्तीबाबत बोलत नाही. भाजपाच्या नेतेमंडळींनी ही गोष्ट मनाला लावून घेऊन नये. पनौती शब्दाचा वापर संपूर्ण देशभरात होत असतो. जे लोक स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात त्यांना तरी या शब्दाविषयी आक्षेप किंवा राग नसावा. हिंदुत्व शब्द कोषात पनौती शब्दाला खूप महत्त्व आहे. तुम्ही बनारसला जा आणि समजून घ्या की पनौती शब्दाचा काय अर्थ होतो. त्यानंतर तुम्ही FIR च्या कामाला लागा. २०१४पासून या देशाला पनौती लागली आहे, २०२४ला ही पनौती संपेल, अशा शब्दांत राऊतांनी भाजपाला सुनावले.
नाना पटोले काय म्हणाले?
"राहुल गांधी राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत असताना सभेतील गर्दीतूनच पनौती, पनौती असा आवाज येत होता, त्या संदर्भाने राहुल गांधी बोलले, त्यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी अथवा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही तरीही भाजपाला ते का झोंबले? त्यातून मोदींचा अपमान कसा होतो? अहमदाबाद स्टेडियमवरील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल मॅच दरम्यान ‘पनौती’ हा शब्द सोशल मीडियावर ‘ट्रेंड’ झाला होता, आजही तो ‘ट्रेंड’ होत आहे, ती एक जनभावना आहे पण सर्व ठिकाणी मीच आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो," असे नाना पटोले म्हणाले.