शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन त्यांच्या यात्रेमध्ये भाजपचे भाडोत्री लोक फिरत होते. त्यांना धनुष्यबाण पेलवणार आहे का ? हा प्रश्न काल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. काल कोकणात अति विराट अशी सभा होती. या सभेनंतर अनेकांचे बोल बिघडले आहेत. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव जरी चोरलं असलं तरी लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत. ही खोक्याने विकत घेतलेली जनता नव्हती. कालच्या सभेनंतर महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपावर तोंडसुख घेतले.
कोकण आणि शिवसेनेत अतूट नातं आहे हे स्पष्ट दिसले. आता मालेगावला उत्तर महाराष्ट्रात सभा होईल. शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या बापाची नाही आहे. जी उचलावी आणि कोणाला द्यावी ही जनतेची आहे. ते काय म्हणतात त्याला उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही. त्यांचे स्क्रिप्ट भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेले होते. त्यानुसार मिंधे गटाचे लोक बोलतात, अशी टीका राऊत यांनी केली.
जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. ही काही लोकशाही नाही ही तानाशाही आहे. जनतेसमोर आणि पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडणे हे आमचे काम आहे. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.
धीरज देशमुख यांच्या जय बेळगावी जय कर्नाटक या घोषणेवर राऊत यांनी मत मांडले आहे. मला याविषयी माहिती नाही. जनतेच्या भावना, महाराष्ट्राच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणायला काही अडचण असेल तर त्यांनी त्या भागात जाऊ नये. जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा, असा सल्लाही राऊतांनी दिला.
मोदी सरकारविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. ही संघर्षाची लढाई आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवे. आप असुद्यात की काँग्रेस असुद्यात. तेजस्वी यादव, अखिलेश यादव या सगळ्यांनी आता एकत्र यायला हवे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.