जाहीर मुलाखतीत रंगणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-खासदार संजय राऊतांचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:41 AM2018-04-07T05:41:25+5:302018-04-07T05:41:25+5:30
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात यावेळी इतिहास घडणार आहे. आजवर शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपाशी अटीतटीचा सामना करणारे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेणार आहेत.
मुंबई - लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात यावेळी इतिहास घडणार आहे. आजवर शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपाशी अटीतटीचा सामना करणारे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेणार आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर प्रथमच संजय राऊत हे ठाकरे कुटुंबाबाहेरच्या राजकीय नेत्याची मुलाखत घेणार आहेत, तसंच मुख्यमंत्रीही प्रथमच शिवसेना नेत्याला एकाच मंचावर जाहीर सामोरे जाणार आहेत.
दैनिक लोकमत समूहाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवले जाते. या पुरस्काराच्या पाचव्या पर्वाचा सोहळा मंगळवारी १० एप्रिलला मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय येथे आयोजित करण्यात आला आहे. इतिहास घडवणारी ही मुलाखत या सोहळ्याचाच एक भाग आहे. संजय राऊत यांचे रोखठोक प्रश्न आणि ‘वाघाच्या जबड्यात घालून हात...’ची आक्रमक भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उत्तरे ही ब्रेकिंगचा विषय ठरणार आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून खासदार संजय राऊत आक्रमकतेने भाजपाविरोधात तोफ डागत असतात. अनेक मुद्द्यांवर शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडतानाच भाजपाला अडचणीत आणण्याचे काम ते करत असतात. अनेकदा भाजपाचे नेते, प्रवक्ते सामनाची दखलही घेत नाहीत असे दाखवण्याचे प्रयत्न करत असतानाच सामनामधील टीकेबद्दल कडवट बोलत असतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वागतात. युती सरकार चालवताना मुख्यमंत्री एकीकडे शिवसेनेला सांभाळून घेण्याची कसरत करतात, दुसरीकडे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणून निवडणूक प्रचार सभांमध्ये मात्र शिवसेनेवर आक्रमकपणे तुटून पडतात. हे दोन नेते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात एकत्र येणार आहेत. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार संजय राऊत जाहीर मुलाखत घेणार असल्याने तोच बातमीचा विषय ठरला आहे.
स्वत:च्या पक्षांसाठी आक्रमकतेने परस्परांवर चढाई करणाऱ्या या नेत्यांचा जाहीर मुलाखतीचा सामना चांगलाच रंगणारा ठरणार आहे. संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सडेतोड उत्तरे ब्रेकिंगचा विषय ठरण्याची शक्यता आहे. विशेषत: गेल्या काही महिन्यांत भारतीय जनता पार्टीचे नेते सबुरीचे धोरण स्वीकारत असताना शिवसेना मात्र आक्रमकता वाढवताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपर्यंत युती टिकणार की त्याआधीच सत्तेतील मित्र उघडपणे एकमेकांवर तुटून पडणार त्याचे संकेतही या मुलाखतीतून मिळण्याची शक्यता आहे.