रामाच्या नावावरील राजकारणाला पूर्णविराम मिळायला हवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:32 AM2024-01-12T11:32:49+5:302024-01-12T11:33:54+5:30

आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा असून तुम्ही बधीर, अंध झालेला आहात. धुतराष्ट्र होऊन निर्णय दिलेला आहे असं राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut's attack on BJP, also criticized Devendra Fadnavis, Eknath Shinde | रामाच्या नावावरील राजकारणाला पूर्णविराम मिळायला हवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

रामाच्या नावावरील राजकारणाला पूर्णविराम मिळायला हवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

नवी दिल्ली - राम मंदिर हे कारसेवकांच्या रक्तातून, त्यागातून आणि बलिदानातून उभं राहिले असं भाजपाला वाटत नसावे किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे उभं राहिले वाटत नसावे. ते फक्त एका व्यक्तीमुळे उभं राहिले असं भाजपाला वाटत असावे. त्यामुळे त्यांना हवं तसं करून घेतायेत. शेवटी राजकारण आहे. रामाच्या नावानं आपण किती काळ राजकारण करणार. कुठेतरी त्याला पूर्णविराम मिळायला हवा असा टोला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होतील त्यामुळे पंतप्रधानांना उद्घाटनाला वेळ मिळाला. राम मंदिर पूर्ण झाले नाही अद्याप अपूर्ण आहे तरीही त्याचे निवडणूक पाहून उद्घाटन होतंय. आपल्या ४ प्रमुख शंकराचार्यांनी अपूर्ण मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येण्यास असमर्थता व्यक्त केली. स्वत:ला हिंदुत्ववादी समजणाऱ्या या प्रमुख नेत्यांनी याचा विचार करायला हवा होता. परंतु राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा विषय असल्याने त्यावर टीकाटीप्पणी करणे योग्य नाही. सध्या देशातील सर्वात मोठे शंकराचार्य हे नरेंद्र मोदी आहेत असं भाजपाला वाटत असावं. त्यामुळे प्रमुख शंकराचार्यांच्या मताला आणि भूमिकेला भाजपानं फार किंमत दिली नसावी असं त्यांनी म्हटलं. 

तसेच नरेंद्र मोदी नाशिकला येतायेत. त्यांच्या कार्यक्रमात आधी काळाराम मंदिरातील दर्शनाचा उल्लेख नव्हता. परंतु हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला. कारण २२ तारखेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काळाराम मंदिरात जाण्याची घोषणा करते. त्यानंतर भाजपाला काळाराम मंदिराची आठवण होते. राम म्हणजे कुरघोडी करण्याचे साधन आहे का? आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो म्हणून पंतप्रधान येणार असतील तर मणिपूरच्या राम मंदिरात उद्धव ठाकरे जातील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मणिपूरला यावे असंही राऊतांनी सांगितले. 


देवेंद्र फडणवीस सुर्पणखा, राऊतांचा हल्ला

बाळासाहेब ठाकरे वाघ आहे तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. कोण आला रे कोण आला असं म्हटल्यावर शिवसेनेचा वाघ आला म्हणतात. प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला बाळासाहेबांनी शिकवले. बाबरी मस्जिद पडल्यानंतर विशेष न्यायालय स्थापन झाले. त्यातील आरोपी पत्रात कुणाची नावे होती. त्यात किती शिवसैनिक आहेत हे भाजपानं सांगावे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेलेचपाचे खोटारडे आहेत. हजारो शिवसैनिक अयोध्येच्या आंदोलनात सहभागी होते. सामनावरच हजारो खटले दाखल झालेत. बाळासाहेब ठाकरे, सतीश प्रधान यासारखे अनेक जण कोर्टात गेले. तुमच्यासोबत आज ज्या शेळ्या आहेत त्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस हे सुर्पणखाच्या भूमिकेत शिरले असून मायावी रुपे घेऊन आणि महाराष्ट्राची दिशाभूल करतायेत असंही राऊतांनी म्हटलं. 

...तर त्याला काय करणार?
  
ठाकरे गटात बेबनाव आहे या अत्यंत चुकीच्या बातम्या आहेत. कुणीतरी एखादा नतद्रष्ट असावा ज्यानं जाणीवपूर्वक ही बातमी पेरून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. यामागे शिंदे गट आहे. २०१३ आणि २०१८ या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारणीची संपूर्ण माहिती, घटनादुरुस्तीसह हे निवडणूक आयोगाला लेखी कागदपत्रासह कळवण्यात आले आहे. त्याबाबतची पोचपावती निवडणूक आयोगाने दिलेली आहे. ती मी स्वत: डोळ्याने पाहिली आहे. त्या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारणीत जे ठराव झाले त्याबाबतचे व्हिडिओचित्रण उपलब्ध आहे. तेसुद्धा निवडणूक आयोगाला आम्ही सादर केले आहे. परंतु सध्याच्या सरकारच्या गुलामासारखे सरपटत न्याय देणारे असेल तर तुम्ही दुसऱ्याला दोष का देता? तुम्ही गुलाम झालेला आहात. तुम्ही संविधान लाथाडलेले आहे. तुम्ही घटनेतील १० वी सूची मानायला तयार नाही. आम्ही सगळी माहिती निवडणूक आयोगाला आणि विधानसभा अध्यक्षांना सोपवली होती. त्यांना दिसत नसेल, मोतीबिंदू झाला असेल तर त्याला काय करणार? असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले. 

दरम्यान, आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा असून तुम्ही बधीर, अंध झालेला आहात. धुतराष्ट्र होऊन निर्णय दिलेला आहे. त्याला कुणी काही करू शकत नाही. परंतु याला उत्तर दिले जाईल. मी स्वत: कागदपत्रे पाहिली आहेत. २०१३ आणि २०१८ च्या कार्यकारणीत अनेक ठराव झालेत. त्याची संपूर्ण माहिती वेळोवेळी निवडणूक आयोगाला कागदावर कळवली आहे. निवडणूक आयोगाचे सही शिक्के असलेली पोचपावती आमच्याकडे आहे. त्यामुळे असं असताना ज्यांच्यावर न्याय देण्याची जबाबदारी आहे आणि त्यांनी न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. हे राज्यातील जनता माफ करणार नाही असा इशारा राऊतांनी दिला. 

Web Title: Sanjay Raut's attack on BJP, also criticized Devendra Fadnavis, Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.