भिवंडीतील रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खारबावच्या सरपंचाचे टोल नाक्यावर उपोषण आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 01:02 PM2021-10-09T13:02:48+5:302021-10-09T13:03:41+5:30
भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे.
नितिन पंडीत
भिवंडी:भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून रस्ता प्रचंड नादुरुस्त झाला आहे.
मात्र या रस्त्यावर सुप्रीम कंपनीमार्फत मालोडी येथील टोल नाका राजरोसपणे सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह शासनाचे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष जावे व हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा या मागणीसाठी खारबाव ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवार पासून मालोडी टोल नाक्यावर आमरण उपोषणास बसले आहेत. या आंदोलनात महेंद्र पाटील यांच्या सोबत खारबाव ग्राम पंचायतीचे एकूण १३ सदस्य तसेच जिल्ह्या परिषद सदस्य रत्ना तांबडे , राष्ट्रवादीच्या सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष व जैष्ठ कार्यकर्ते कमलाकर टावरे , मालोडीचे उपसरपंच विशाल पाटील , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश गुळावी , प्रवीण पाटील , प्रशांत म्हात्रे आदी कार्यकर्त्यांसह साईस गृपचे तरुण कार्यकर्ते देखील य उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान शुक्रवारी रात्री सरपंच महेंद्र पाटील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णलयात हलविण्यात आले होते, मात्र उपचार घेतल्यांनातर शुक्रवारी पहाटे पुन्हा उपोषणस्थळी येत सरपंचांनी आपले उपोषण सुरूच ठेवले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी आज ( शनिवारी ) दुपारी सार्वजनिक बंधकाम विभागाचे अधिकारी सरपंच पाटील यांची भेट घेणार आहेत.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलने देखील केली आहेत. मात्र प्रत्येक आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व टोल कंपनी नागरिकांना रस्ता लवकरात लवकर दुरुस्तीचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगतात व रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची आश्वासने देतात. त्यांनतर आंदोलन स्थगित झाल्या नंतर रस्त्याची थातूर मातूर दुरुस्ती करून सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी आपले हात झटकतात. ज्याचा त्रास स्थानिक नागरिकांसह वाहन चालक व प्रवाशांना होत आहे. मात्र याकडे सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खरबावचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवकार पासून उपोषणास बसले असून, हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद करावा, काँक्रेटकरणाचे व दुरुस्तीचे काम उच्च दर्जाचे असावे, रस्त्याची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत या व अशा मागण्यांसाठी सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवार पासून मालोडी टोल नाक्याच्या बाजूलाच उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते महेंद्रपाटील यांनी दै. लोकमतला दिली आहे.