Abhijeet Bichukale, Worli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live: विधानसभा निवडणुकीत २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी करण्यात आली. त्यात भाजप-शिंदे-अजितदादा महायुतीला मोठा विजय मिळाला. राज्यात राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षाची संख्या खूप जास्त असली तरीही यंदाची निवडणूक ही प्रामुख्याने महायुती विरूद्ध महाविकास आघाडी या दोन गटात होती. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात काँटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण महायुतीने थेट २०० पार मजल मारली. यंदाच्या निवडणुकीत 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांनीदेखील उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. तसेच, पवार विरूद्ध पवार अशी चर्चेतील लढत असलेल्या बारामतीतूनही ते उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. पाहूया त्यांनी किती मते मिळाली.
साताऱ्यात अभिजीत बिचुकले सहाव्या क्रमांकावर
सातारा मतदारसंघात भाजपाच्या तिकीटावर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी निवडणूक जिंकली. त्यांनी तब्बल १,४२,१२४ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. त्यांची लढत शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम यांच्याविरोधात होती. शिवेंद्रराजे यांना एकूण १,७६,८४९ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाच्या अमित कदम यांना ३४,७२५ मतांवर समाधान मानावे लागले. या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या डॉ. अभिजीत आवाडे-बिचुकले यांना एकूण ५२९ जागा मिळाल्या.
बारामतीत अभिजीत बिचुकलेंचे डिपॉझिट जप्त
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यापासून पवार विरूद्ध पवार असे दोन सामने झाले. त्यात पहिल्या सामन्यात सुप्रिया सुळेंच्या विजयासह शरद पवार गट वरचढ ठरला होता. यावेळी अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगला होता. यात शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांना ७९,०६४ मते मिळाली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १,७८,१०९ मते मिळाली. या मतदारसंघातही अभिजीत बिचुकले यांना काहीही प्रभाव पाडता आला नाही. अभिजीत बिचुकले यांना साधी शंभरीही गाठता आली नाही. त्यांना अवघी ९२ मते मिळाली.