साठे महामंडळाचे महाव्यवस्थापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:14 AM2018-05-05T06:14:32+5:302018-05-05T06:14:32+5:30
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळ्यांच्या फायली लंपास करण्यात आल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्ताची गंभीर दखल घेत सरकारने महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्रय झोंबाडे यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच व्यवस्थापकीय संचालक अनिल अहिरे यांच्याकडील सूत्रे काढून घेण्यात आली.
- यदु जोशी
मुंबई - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळ्यांच्या फायली लंपास करण्यात आल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्ताची गंभीर दखल घेत सरकारने महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्रय झोंबाडे यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच व्यवस्थापकीय संचालक अनिल अहिरे यांच्याकडील सूत्रे काढून घेण्यात आली.
फायली लंपास झाल्याचे वृत्त वाचून सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शुक्रवारी सायंकाळी दहिसरमधील कल्याणी केंद्र इमारतीतील साठे महामंडळाच्या कार्यालयाची पाहणी केली. महामंडळाचे महाव्यवस्थापक झोंबाडे यांना निलंबित केल्याचे व सामाजिक न्याय विभागात सहसचिव असलेले अहिरे यांच्याकडून महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतल्याचे राज्यमंत्री कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
या महामंडळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांचा भाऊ उमेश व त्याच्या साथीदारांनी कल्याणी केंद्र इमारतीचे सील व कुलूप तोडून फायली गहाळ केल्याचा आरोप आहे.
मात्र उमेश यांनी शुक्रवारी हा आरोप फेटाळला. महामंडळाचे कार्यालय २०१३मध्येच बंद झाले असून सीआयडीने आधीच सर्व रेकॉर्ड जप्त केले आहे. त्यामुळे फायली लंपास करण्याचा प्रश्नच नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, इमारतीतील कार्यालयात फायली आधीपासूनच होत्या, असे महामंडळाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
सहा दिवस पोलीस काय करत होते?
फायली लंपास झाल्याची तक्रार २८ एप्रिलला दहिसर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सहा दिवस झाले तरी पोलिसांनी त्यावर काहीही कारवाई केलेली नाही. महामंडळाच्या कार्यालयाची पाहणीही केलेली नाही. त्यामुळे दहिसर पोलीस ठाणेही यानिमित्ताने संशयाच्या घेऱ्यात आले आहे.
दरोड्याचा गुन्हा दाखल
फाईल गहाळ प्रकरणी अखेर शुक्रवारी दहिसर पोलीस ठाण्यात शुक्रवारी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी कल्याणी केंद्राला भेट दिल्यानंतर साठे महामंडळाचे कार्यालय फोडल्याचे व तेथील सामान अस्ताव्यस्त केल्याचे त्यांना आढळले. काही फाईली गायब झाल्या आहेत. सीआयडीचे पथक शनिवारी येथे पाहणीसाठी येणार असल्याचे स्वत: कांबळे यांनी लोकमतला सांगितले.
चार सदनिका कदमांकडेच
सामाजिक न्याय विभागाच्या ‘कल्याणी केंद्र’ या चार मजली इमारतीत ज्या १६ सदनिका आहेत त्यातील चार सदनिका रमेश कदम व त्यांच्या कुटुंबाशी संबंधित संस्थांकडे आहेत.
मोरेंच्या फायलीचे काय झाले?
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे यांना नेमण्यात यावे, अशी शिफारस विभागाच्या सचिवांनी करून सहा महिने झाले; पण ही फाईल सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडेच निर्णयाच्या प्रतीक्षेत पडून असल्याचे समजते.